
no images were found
जामीन मिळाल्यानंतर काही तासांतच गुजरात पोलिसांनी तृणमूलचे प्रवक्ते साकेत गोखले यांना पुन्हा अटक
गांधीनगर : गुजरातच्या मोरबी दुर्घटनेनंतर साकेत गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक ट्विट केलं होतं. हे ट्विट करून गोखले यांनी समाजात चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर होता. गोखले यांनी मोदींशी संबंधित एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोरबी दौऱ्यावर ३० कोटी रुपये खर्च झाल्याचे म्हटले होते.
३० ऑक्टोबर रोजी मोरबी येथील झुलता पूल कोसळून १३५ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र साकेत गोखले यांचे हे विधान चिथावणीखोर असल्याचे गुजरात पोलिसांचे म्हणणे आहे. गोखलेंच्या या विधानामुळे निवडणुकीच्यावेळी एकाच चर्चा सुरु झाली होती. एका बातमीचा हवाला देत गोखले यांनी म्हटलं होतं की, ५.५ कोटी रुपये हे निव्वळ पंतप्रधानांच्या स्वागतासाठी, फोटोग्राफीसाठी आणि कार्यक्रमाच्या आयोजनावर उडवण्यात आले. गोखले यांनी दावा केला होता की मोदींच्या इव्हेंट मॅनेजमेंट आणि जनसंपर्कासाठी खर्च केलेल्या रकमेचे मूल्य हे १३५ लोकांच्या जीवापेक्षा अधिक आहे. कारण या १३५ लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखांची मदत देण्यात आली होती ज्याची बेरीज ही 5 कोटी रुपये आहे. गोखले यांचे हे ट्विट बरंच चर्चेत आलं होतं.
गुजरात भाजपने हे आरोप फेटाळताना म्हटलं होतं की, अशा प्रकारची माहिती आरटीआय अंतर्गत कोणीही माहिती मागवली नव्हती आणि आरटीआय अंतर्गत असं कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही. ही एक थाप असून खोटी बातमी आहे असं भाजपने म्हटलं होतं. साकेत गोखलेंच्या अटकेनंतर टीएमसीच्या नेत्यांचे पथक मोरबीला रवाना झाले आहे. गोखले यांच्या अटकेबाबत टीएमसीचे नेते डेरेक ओब्रायन यांनी आरोप केले आहेत. ते म्हणाले की, साकेत गोखले यांना कोणतीही नोटीस किंवा वॉरंट न देता अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी गोखले यांच्या समर्थनार्थ टीएमसीच्या ५ नेत्यांची टीम मोरबीला पोहोचली आहे. या टीममध्ये डॉ.शंतनु सेन, खलीलूर रहमान, असित कुमार, डोला सेन आणि सुनील कुमार मंडल यांचा समावेश आहे. टीएमसीचे नेते डेरेक ओब्रायन म्हणाले की, साकेत गोखले यांच्यावरील ही कारवाई पूर्णपणे चुकीची आहे.