no images were found
सीडीएसएलकडून ‘रीइमॅजिन आयडियाथॉन २.०’ लाँच; विद्यार्थ्यांना ११.५ लाखांच्या बक्षिसांची संधी
कोल्हापूर : सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)ने ‘रीइमॅजिन आयडियाथॉन २.०’ हा उपक्रम सुरू केला आहे. आर्थिक साक्षरता, गुंतवणूकदार जागरूकता आणि सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील अव्वल पाच संघांसाठी एकूण ११.५ लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
वर्ल्ड इन्व्हेस्टर वीक २०२६ दरम्यान सुरू झालेला हा उपक्रम सेबीच्या ‘प्रोजेक्ट जागरूक’ला पूरक आहे. मोबाइल अॅप्स, वेबसाइट्स, चॅटबॉट्स, गेम्स आणि एआय-आधारित उपायांच्या माध्यमातून गुंतवणूकदार शिक्षण अधिक सोपे व प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे.
सीडीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहल वोरा यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे गुंतवणूकदारांना आर्थिक निर्णय अधिक आत्मविश्वासाने घेण्यास आणि सायबर फसवणुकीपासून सावध राहण्यास मदत होईल.
स्पर्धेत नाविन्यता, उपयुक्तता, व्यवहार्यता, सुलभता आणि डेटा संरक्षण या निकषांवर संकल्पनांचे मूल्यमापन केले जाईल. ज्युरीचे अध्यक्षपद एस. रामदोराई भूषवणार आहेत.
स्पर्धेसाठी नोंदणी ७ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली असून, अधिक माहिती आणि नोंदणीसाठी https://ideathon.cdslindia.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.