no images were found
शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातील दोन विद्यार्थ्यांचा मॉस्को येथील आंतरराष्ट्रीय रसोफिल चळवळीच्या चौथ्या परिषदेत सहभाग
शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातील रशियन भाषेचे विद्यार्थी वैभव कदम आणि प्राजक्ता डवरी यांची १६ ते १८ सप्टेंबर २०२६ दरम्यान मॉस्को, रशिया येथे होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय रसोफिल चळवळी’च्या चौथ्या परिषदेत सहभागी होण्यासाठी निवड झाली आणि ते या परिषदेत सहभागी झाले आहेत. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर ११ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत मॉस्को शहरात विविध नियोजित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्राजक्ता डवरी या रशियन भाषा एम.ए. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी आहेत, तर वैभव कदम हे रशियन भाषा पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत.
‘आंतरराष्ट्रीय रसोफिल चळवळ’ (International Movement of Russophiles) ही संस्था विविध देशांतील सार्वजनिक व्यक्ती, संस्कृती व विज्ञान या विषयांचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञ समुदाय, तसेच रशियन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व प्रसार यात रस असलेल्या नागरिकांना एकत्र आणते.
यंदाची परिषद ही ऐतिहासिक स्मृती, रशिया आणि त्याचा प्राचीन इतिहास, संस्कृती, तसेच आध्यात्मिक-नैतिक परंपरांप्रति आदर या मूल्यांभोवती सहभागींना एकत्र आणणारा आंतरराष्ट्रीय सार्वजनिक मंच आहे.
या परिषदेची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
- परस्पर आदर, मैत्री आणि रचनात्मक संवादाच्या आधारे आंतरराष्ट्रीय मानवतावादी व सामुहिक संबंध दृढ करणे;
- रशियाचे वस्तुनिष्ठ प्रतिनिधित्व आणि सहकार्याच्या विकासात स्वारस्य असलेल्या विदेशी सार्वजनिक व्यक्ती, संस्कृती, विज्ञान या क्षेत्रांतील अभ्यासक आणि तज्ज्ञ समुदायातील घटकांना एकत्र आणणे;
- स्मृती जपण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय सार्वजनिक उपक्रमांना पाठबळ देणे;
- ऐतिहासिक सत्याचे जतन करणे आणि ऐतिहासिक तथ्यांचे असत्यीकरण व विकृतीकरण रोखणे;
- रशियन इतिहास, संस्कृती आणि पारंपरिक आध्यात्मिक-नैतिक मूल्यांप्रति आदर दृढ करणे;
- तरुण पिढीमध्ये देशभक्तीपर व नागरिकत्वपर शिक्षणाचा प्रसार करणे आणि पिढ्यांतील सातत्य जपणे;
- विदेशी जनतेमध्ये रशियन ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लोकप्रिय करणे.
या परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय रसोफिल चळवळीने सहभागी विद्यार्थ्यांचा हवाई प्रवास, तसेच निवासव्यवस्था यांसह इतर संपूर्ण खर्च देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातील विद्यार्थ्यांची अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेसाठी झालेली निवड ही विद्यापीठासाठी, तसेच महाराष्ट्रातील रशियन भाषा-अध्ययन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे.
यापूर्वीही गेली दोन वर्षे विदेशी भाषा विभागातील रशियन भाषा शिकणाऱ्या आठ विद्यार्थ्यांनी मॉस्को येथील ‘रशियन पीपल्स फ्रेन्डशिप विद्यापीठा’तर्फे आयोजित १५ दिवसांच्या मोफत समर कोर्समध्ये सहभाग घेतला आहे व ते यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. रशियन भाषेचे अध्ययन कोल्हापुरातील विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील युवा चळवळीशी जोडून घेण्याच्या नवनव्या संधी उपलब्ध करून देत आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विदेशी भाषा विभाग करत आहे.
या परिषदेतील विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभागासाठी रशियन भाषा शिक्षिका डॉ. मेघा पानसरे व ज्योती पाटील, तसेच डॉ. अक्षय सरवदे, प्रभारी विभागप्रमुख, विदेशी भाषा विभाग यांचे सहकार्य झाले.