no images were found
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात वॉकेथॉन
कोल्हापूर,: हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाचा क्रीडा अधिविभाग आणि स्पोर्ट्स क्लबतर्फे आज सकाळी वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून वॉकेथॉनला प्रारंभ करण्यात आला. ‘फिट इंडिया, ॲक्टिव्ह इंडिया, हेल्दी इंडिया’चा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध वयोगटांतील विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह दोनशेहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी कुलगुरू डॉ. राजनीश कामत म्हणाले, मेजर ध्यानचंद जिथे शिकले, ते एल्फिन्स्टन महाविद्यालय समाविष्ट असलेल्या डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचा कुलगुरू होण्याची संधी मला लाभली, याचा विशेष आनंद आणि अभिमान वाटतो. मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानाचे स्मरण करत त्यांनी निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि क्रीडाभावना अंगिकारण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वतः कुलगुरूंनी वॉकेथॉनमध्ये सहभागी होत उपस्थितांना प्रोत्साहन दिले. विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारीही मोठ्या संख्येने वॉकेथॉनमध्ये सहभागी झाले. ‘वॉक फॉर फिटनेस, वॉक फॉर हेल्थ, वॉक फॉर युनिटी’ या संदेशातून आरोग्य, एकता आणि क्रीडाभावनेचा जागर करण्यात आला. ‘एकत्र चालूया, निरोगी राहूया, फिट भारत घडवूया’ हा संदेशही देण्यात आला.
वॉकेथॉनमध्ये प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी अशा विविध गटांसाठी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आली. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आले. ४० वर्षांपर्यंत, ४० ते ५० वर्षे आणि ५० ते ६० वर्षे अशा वयोगटांमध्ये स्पर्धा झाली. विविध गट व वयोगटांतील विजेत्यांना कुलगुरू डॉ. कामत, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पदके प्रदान करून गौरविण्यात आले.
सुरवातीला कुलगुरू डॉ. कामत यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अजय मराठे यांनी सूत्रसंचालन केले, तर किरण पाटील यांनी आभार मानले. वॉकेथॉनमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. कबीर खराडे, संगणक केंद्र संचालक डॉ. अभिजीत रेडेकर, डॉ. सुभाष कोंबडे, कास्ट्राईबचे आनंद खामकर, डॉ. राजेंद्र रायकर, राष्ट्रीय खेळाडू प्रतीक पाटील, प्रणव पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अतुल टोणे, डॉ. सविता भोसले, सुजित नाईक, अजय मराठे, कृष्णात पाटील, संग्रामसिंग मोरे, प्रसाद देसाई, सुनील शिंदे, आकाश पाटील, तौहीद मुल्ला आणि नंदेश यांनी केले.
वॉकेथॉन स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे असा- लहान गट (मुले): भावेश बिष्ट, राजवीर चौगुले, सर्वज्ञ खोत. लहान गट (मुली): येसू पाटील, पूर्वा गुरव, संस्कृती खंडागळे. मोठा गट (मुले): विक्रम भोसले, ज्योतिबा पाटील, श्रीधर खोत. मोठा गट (मुली): अवंती अवधूत सूर्यवंशी, प्रज्ञा प्रशांत जाधव, स्वरा शैलेश कुलकर्णी. शिक्षकेतर कर्मचारी (४० वर्षांखालील): रोशन पाटील, अभिजीत जाधव, अभिजीत कोठावळे. शिक्षकेतर कर्मचारी (४१ ते ५० वर्षे): प्रशांत जाधव, सतीश हुक्केरी. शिक्षक गट: डॉ. नवनाथ वळेकर, जयप्रकाश पाटील, रवींद्र खैरे. महिला शिक्षक: प्रा. आसावरी कागवाडे, प्रा. दिपाली गवस. शिक्षकेतर कर्मचारी (महिला): सुरेखा अडके. प्रशासकीय अधिकारी: अजित इंगळे. यावेळी वॉकेथॉनमध्ये प्रेरणादायी सहभाग नोंदविल्याबद्दल माजी सैनिक प्रकाश गुरव आणि श्रीमती आसमा बडेखान यांचा विशेष गौरव करण्यात आला.