Home Uncategorized संवाद, जनजागृतीच्या माध्यमातून तृतीयपंथींचे समावेशन शक्य: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

संवाद, जनजागृतीच्या माध्यमातून तृतीयपंथींचे समावेशन शक्य: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

3 second read
0
0
7

no images were found

संवाद, जनजागृतीच्या माध्यमातून तृतीयपंथींचे समावेशन शक्य: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

  कोल्हापूर, : संवाद आणि जनजागृती या माध्यमातून तृतीयपंथी नागरिकांचे मुख्य प्रवाहात समावेशन करण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात आज सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, कोल्हापूर आणि विद्यापीठाचे सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तृतीयपंथीय कल्याण, हक्क व संरक्षण कायदा २०१९ व सुधारित नियम २०२०’ यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. कामत बोलत होते. यावेळी समाजकल्याणचे सहायक आयुक्त सचिन साळे, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रेश्मा पाटील, शासनाच्या तृतीयपंथी हक्क कल्याण समिती सदस्य मयुरी आळवेकर आणि शिवानी गजबर प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत सामाजिक समतेची मुहूर्तमेढ रोवली गेली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आणि संविधानाने प्रत्येक नागरिकाला, त्याची लैंगिक ओळख कोणतीही असो, सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार दिला. मात्र, कायद्यात अधिकारांची तरतूद असली तरी समाजात त्याबाबत व्यापक जनजागृती आणि सातत्यपूर्ण संवादाची गरज आहे. तृतीयपंथी समुदायातील अनेक व्यक्ती सामाजिक भीती अथवा संकोचामुळे आपली ओळख उघडपणे मांडत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे अनुभव, अडचणी आणि अपेक्षा समजून घेणे तसेच समाजाने त्यांचा स्वीकार करणे आवश्यक आहे.  तृतीयपंथी समुदाय हा समाजाचा उपेक्षित नव्हे, तर अविभाज्य घटक असून त्यांच्या हक्कांसाठी आणि सक्षमीकरणासाठी काम करणे ही समाजाची जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तृतीयपंथी बांधवांसाठी संवेदनशील वातावरण, सर्वसमावेशक पायाभूत सुविधा, शैक्षणिक संधी तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

‘तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम हे समावेशाचे प्रभावी उदाहरण’

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम उभारण्यात आल्याचा उल्लेख करून डॉ. कामत म्हणाले, पूरस्थितीत बोट चालविणे, बचावकार्य आणि प्रथमोपचार यासाठी ही टीम सक्षम आहे. समाजाकडून अनेकदा उपेक्षा सहन करावी लागलेल्या समुदायाने संकटकाळात इतरांच्या जीवितरक्षणाची जबाबदारी स्वीकारणे, हे सक्षमीकरणाबरोबरच सामाजिक समावेशाचे प्रभावी उदाहरण आहे. समता, बंधुता, न्याय आणि करुणा या मूल्यांवर आधारित समाजाच्या निर्मितीसाठी प्रशासन, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मयुरी आळवेकर यांनी, शिवाजी विद्यापीठाने तृतीयपंथीयांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेतले आहे. त्यांना वेळोवेळी उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यातही पुढाकार घेतला आहे. तथापि, व्यापक समाजाने तृतीयपंथीयांना वेगळे न पाहता त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घ्यावे आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, सामाजिक समावेशन केंद्राचे संचालक डॉ. मुरलीधर भानारकर यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. सहायक आयुक्त सचिन साळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समाजकल्याणचे तालुका समन्वयक सचिन परब यांनी सूत्रसंचालन केले, तर समाजकल्याण अधिकारी अक्षय कुरणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी अंजली केसरकर यांच्यासह डॉ. किशोर खिलारे, डॉ. दीपक भोसले, डॉ. सरोज बीडकर तसेच, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी विविध महाविद्यालयांचे शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तृतीयपंथी समजून घेताना…

दरम्यान, आज दिवसभरात झालेल्या विविध सत्रांमध्ये तृतीयपंथीय नागरिकांच्या समस्या, त्यांचे निराकरण, त्यांना सहकार्य आणि कायदेशीर मदत या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चर्चा झाली. कोल्हापूर जिल्हास्तरीय तृतीयपंथी हक्क व तक्रार निवारण समिती सदस्य शिवानी गजबर यांनी ‘तृतीयपंथी समजून घेताना…’ या विषयावर अतिशय अंतर्मुख करणारे सादरीकरण केले. त्यानंतर ‘तृतीयपंथी कायदे व धोरणांबाबत सामाजिक जागृती’ या विषयावर अविनाश भाले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

महिलांना संधी, हक्क आणि सुरक्षिततेची जाणीव करून देण्यावर भर: प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव

महिलांना संधी, हक्क आणि सुरक्षिततेची जाणीव करून देण्यावर भर: प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव क…