no images were found
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), उपकेंद्र कोल्हापूर:
कौशल्य विकास योजनांच्या यशोगाथेचा लेख: महाराणी सईबाई सारथी महिला आर्थिक सक्षमीकरण कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या कौशल्य विकास विभागामार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील युवक-युवती आणि महिलांच्या रोजगारक्षमता, उद्योजकता व आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध कौशल्य विकास योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी सारथीमार्फत महाराणी सईबाई सारथी महिला आर्थिक सक्षमीकरण कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत महिलांना बेकरी प्रोडक्ट मेकिंग, दुग्धव्यवसाय व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, राईस प्रोसेसिंग, मसाले पदार्थ, काजू प्रक्रिया शिवणकला, फॅशन डिझायनिंग, ब्युटी अँड वेलनेस, संगणक प्रशिक्षण, डिजिटल कौशल्ये, खाद्य प्रक्रिया, गृहउद्योग व्यवस्थापन व उद्योजकता विकास यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते.
सन २०२४-२५ या कालावधीत एकूण १५० महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ घेवून ३६ महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. या उपक्रमामुळे महिलांना स्वयंरोजगार व उत्पन्न निर्मितीच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे आर्थिक स्वावलंबन बळकट होत आहे.
1.सारथी लाभार्थी मेघा इंद्रजित शिंदे यांची यशोगाथा:
सारथी संस्थेमार्फत आयोजित उद्योजकता बेकरी निर्मितीवर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रम या प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यानंतर मेघा इंद्रजीत शिंदे यांनी ‘राणाजी स्वीट्स अॅण्ड बेकर्स’ या व्यवसायाची यशस्वी सुरुवात केली. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांना उत्पादन निर्मिती, विक्री व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील स्पर्धेबाबत मर्यादित माहिती होती. मात्र, प्रशिक्षणादरम्यान पदार्थ तयार करण्याच्या आधुनिक पद्धती, विक्री कौशल्य, स्वच्छतेचे महत्त्व, तसेच व्यवसायासाठी आवश्यक नोंदणी व कायदेशीर बाबींचे सखोल मार्गदर्शन मिळाले.
उत्पादनांचे प्रभावी मार्केटिंग कसे करावे याविषयी मिळालेल्या मार्गदर्शनाचा त्यांना मोठा फायदा झाला. त्यामुळे त्यांनी आपल्या उत्पादनांची ग्राहकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवून व्यवसायाचा विस्तार साधला.
आज ‘राणाजी स्वीट्स अॅण्ड बेकर्स’च्या माध्यमातून त्या विविध दर्जेदार खाद्यपदार्थांची निर्मिती व विक्री करत असून व्यवसायातून दरमहा ४५ ते ५० हजार रुपये उत्पन्न मिळवत आहेत. सध्या त्या स्वतः व्यवसायात सक्रियपणे कार्यरत असून त्यांच्यासोबत एक कामगारालाही रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
2.सारथी लाभार्थी पूनम स्वप्निल पाटील यांची यशोगाथा:
सारथी संस्थेमार्फत आयोजित मसाला निर्मितीवर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रम या प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यानंतर पूनम स्वप्निल पाटील यांनी ‘हॉटेल हिंदवी’ या व्यवसायाची यशस्वी सुरुवात केली. प्रशिक्षणापूर्वी व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असली तरी त्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान, व्यवस्थापन कौशल्य आणि आत्मविश्वासाची कमतरता होती. मात्र, सारथीच्या प्रशिक्षणामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा आणि दिशा मिळाली.
प्रशिक्षणादरम्यान मसाले तयार करण्याच्या पद्धती, उत्पादनांची गुणवत्ता राखणे, विक्री व विपणन कौशल्य, स्वच्छतेचे महत्त्व तसेच व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या नोंदणी व इतर प्रशासकीय बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली. या मार्गदर्शनामुळे व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक आत्मविश्वास निर्माण झाला.त्यांनी ‘हॉटेल हिंदवी’ची स्थापना केली.
आज त्या आपल्या व्यवसायातून ग्राहकांना दर्जेदार सेवा देत असून दरमहा सुमारे १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजात त्या स्वतः सक्रियपणे सहभागी असून त्यांच्या व्यवसायामुळे एका व्यक्तीस रोजगाराची संधी देखील उपलब्ध झाली आहे.
सारथीच्या कौशल्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या विविध योजनांमुळे युवक, युवती व महिलांना रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळत आहे. राज्य शासनाच्या कौशल्य विकास व आर्थिक सक्षमीकरणाच्या उद्दिष्टांना पूरक ठरत या योजनांद्वारे समाजातील विविध घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी, असे आवाहन सारथीच्यावतीने करण्यात आले आहे.