Home Uncategorized एस.आय.आर.मध्ये पारदर्शकता सर्वोच्च मानून कामे करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम

एस.आय.आर.मध्ये पारदर्शकता सर्वोच्च मानून कामे करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम

3 second read
0
0
10

no images were found

एस.आय.आर.मध्ये पारदर्शकता सर्वोच्च मानून कामे करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम

कोल्हापूर जिल्ह्यातील मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा

 कोल्हापूर, : मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून विशेष सखोल पुनरिक्षणानंतर दोषविरहित आणि अद्ययावत नवीन मतदार यादी अस्तित्वात येणार आहे. सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तटस्थपणे आणि पारदर्शकतेने ही प्रक्रिया राबवावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिले.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना नष्टे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली.

मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करणे, शहरीकरण आणि स्थलांतरामुळे निर्माण झालेली दुबार नावे वगळणे, मृत व्यक्तींची नावे कमी करणे तसेच नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे या कायदेशीर प्रक्रियेला गती देणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. जून ते ऑक्टोबर या कालावधीत गणना अर्जांची छपाई, बीएलओ प्रशिक्षण, घराघरांत जाऊन गणना प्रपत्रांचे वाटप आणि संकलन ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नागरिकांसाठी ऑनलाइन प्रपत्र भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ही मोहीम अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी ३ हजार ४५० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्यक्ष घरभेटीद्वारे पडताळणी करणार आहेत. तसेच विविध राजकीय पक्षांकडून ३ हजार ९२८ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नियुक्त करण्यात आले असून, या संख्येत राजकीय पक्षांकडून आणखी वाढ करण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्या. राज्यात आजमितीस ७२.०४ टक्के मॅपिंग पूर्ण झाले असून, कोल्हापूर जिल्ह्यात ८०.९१ टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे.

बैठकीपूर्वी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच पुनरिक्षण कार्यक्रमाच्या प्रशासकीय नियोजनाचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कामाच्या प्रगतीची सविस्तर माहिती जाणून घेतली.

यावेळी श्री. चोकलिंगम यांनी मतदार गणना प्रपत्रांचे वाटप व संकलन करताना संबंधित कुटुंबातील व्यक्तीची सही अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक घर, झोपडी किंवा निवासस्थानाला स्वतंत्र ओळख क्रमांक देणे, कुटुंबाचा संपर्क क्रमांक आणि संपूर्ण पत्ता नोंदविणे यावरही त्यांनी भर दिला. प्रत्येक बीएलओ आणि बीएलए यांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

झोपडपट्ट्या, दुर्गम भाग तसेच तृतीयपंथीयांसह सर्व घटकांतील नागरिकांचा मतदार यादीत समावेश सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे अधिकार मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक आठवड्याला कामाची प्रगती, आक्षेप, नवीन नोंदणी आणि इतर तपशील राजकीय पक्षांच्या निदर्शनास आणून पारदर्शकता वाढवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मतदार मॅपिंगदरम्यान संबंधित मतदार आढळून न आल्यास त्याची माहिती बीएलएला देऊन त्याबाबत स्वाक्षरीसह अहवाल तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच नावे वगळण्याच्या प्रस्तावित याद्या सार्वजनिक करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. एकही पात्र मतदार वगळला जाऊ नये आणि एकही अपात्र व्यक्ती यादीत राहू नये, अशी भूमिका प्रशासनाने ठेवावी, असे ते म्हणाले. तयार होणारी मतदार यादी ही केवळ दुरुस्त किंवा सुधारित नसून संपूर्ण नव्या स्वरूपातील असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

*एस.आय.आर. वेळापत्रक*
२० ते २९ जून २०२६ – गणना अर्जांची छपाई आणि बीएलओ यांचे प्रशिक्षण
३० जून ते २९ जुलै २०२६ – बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांना गणना प्रपत्राचे वाटप व भरलेले अर्ज परत घेतील.
५ ऑगस्ट २०२६ – प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ – या प्रारुप यादीवर दावे व हरकती नोंदवता येतील,
३ ऑक्टोबर २०२६ – पर्यंत दावे व हरकती निकालात काढल्या जातील
७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी केली जाईल.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

टॅक्सी/ऑटोरिक्षा वाहन धारकांना परिवहन विभागाकडून आवाहन

टॅक्सी/ऑटोरिक्षा वाहन धारकांना परिवहन विभागाकडून आवाहन  कोल्हापूर,  : परिवहन मंत…