no images were found
आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात पुण्यात बॅनरबाजी, आमचं ठरलंय-कोल्हापूरचं पार्सल कोल्हापूरला पाठवायचंय, अशा शब्दात काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी
पुणे: पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमधील असंतोष आणि गटबाजी उफाळून आलीय. त्यातून आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात बॅनरबाजी दिसून येतीय. काँग्रेसचे पुणे प्रभारी सतेज पाटील यांनी कोल्हापूर हारल्यानंतर पुण्यातही पक्ष सपाट केलाय. त्यामुळं आमचं ठरलंय, कोल्हापूरचं पार्सल कोल्हापूरला पाठवायचंय, अशा शब्दात काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. पुण्यातील ही बॅनरबाजी सोशल मीडियावर चांगलीच गाजतीय.
पुणे काँग्रेसमधील गटबाजी आणि नाराजी उफाळून आलीय. त्यातून काँग्रेसचे पुणे प्रभारी असलेल्या सतेज उर्फ बंटी पाटलांच्या विरोधात पुण्यात ठिकठिकाणी पोस्टर झळकली आहेत. इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसकडून पुण्यासाठी प्रशांत जगताप आणि दिप्ती चौधरी असे दोन शहराध्यक्ष निवडले गेलेत. महापालिका निवडणुकीपूर्वी अचानक काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या प्रशांत जगताप यांना थेट शहराध्यक्ष केल्यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना डावलून नव्यानं पक्षात आलेल्यांना संधी दिल्याबद्दल नाराजी म्हणून, पुणे शहरात ठिकठिकाणी सतेज पाटील यांच्या विरोधात बॅनर झळकले आहेत. आमचं ठरलंय, कोल्हापूरचं पार्सल कोल्हापूरला पाठवायचं, अशा शब्दात काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी आणि संताप व्यक्त केलाय. माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे हे शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. पण त्यांनाही डावलल्यानं पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यातूनच सतेज पाटील यांच्या विरोधातील झळकलेले बॅनर आज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेत.