no images were found
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कनोईंग व कयाकिंग स्पर्धांचे
शिवाजी विद्यापीठामार्फत सांगली येथे आयोजन:
महाराष्ट्रात प्रथमच होणार राष्ट्रीय स्पर्धा;
देशभरातील ४० विद्यापीठांमधील ६८५ क्रीडापटूंचा सहभाग
कोल्हापूर : भारतीय विद्यापीठे महासंघ (ए.आय.यू.) आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कनोईंग व कयाकिंग (पुरुष व महिला) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. ५ एप्रिल ते बुधवार दि. ८ एप्रिल या कालावधीत सांगली येथे कृष्णा नदीमध्ये या स्पर्धा होतील. सदर स्पर्धा महाराष्ट्रात प्रथमच आयोजित केल्या जात असून त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. ही माहिती शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी आज दिली. शिवाजी विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेस ऑनलाईन संबोधित करताना ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर स्पर्धा सांगली येथील “कै. वसंत दादा पाटील स्मृती स्मारक कृष्णा नदी घाट” येथील रॉयल बोट क्लब येथे होणार आहेत. या स्पर्धेत देशभरातील ४० विद्यापीठांमधून ६८५ पुरुष व महिला खेळाडू सहभागी होतील. खेळाडू प्रशिक्षक व पंच यांची निवास व्यवस्था मिशन हॉस्पिटल मिरज येथील विद्यार्थी विद्यार्थिनी वसतीगृहामध्ये केली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंचांची निवास व्यवस्था मिशन हॉस्पिटलच्या गेस्ट हाऊस येथे करण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील नौकानयनातील उदयोन्मुख खेळाडू व क्रीडाप्रेमी यांना सदर स्पर्धा पाहण्याची मोठी संधी प्राप्त झाली असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागाचा अनुभव व वातावरण निर्मितीच्या दृष्टीने विद्यापीठाच्या वतीने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी सांगितले की, स्पर्धेचे उद्घाटन रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता सांगली येथील कै. वसंतदादा पाटील स्मारक कृष्णा नदी घाट येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते व प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सन्माननीय अतिथी म्हणून सांगलीचे जिल्हाधिकारी मैनक घोष, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव कुलसचिव डॉ. विलास शिंदे, सांगलीचे आमदार धनंजय उर्फ सुधीर गाडगीळ, सांगलीचे महापौर धीरज सूर्यवंशी आणि स्पर्धा निरीक्षक यांचीही यावेळी उपस्थिती असेल.
प्रत्यक्ष स्पर्धा ५ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता सुरू होतील. स्पर्धेत कयाकिंग मध्ये K1, K2, K4 तसेच कनोईंग मध्ये C1, C2 असे 200 मी. 500 मी. व 1000 मी. या जलक्रीडा प्रकारात स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ८ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता होणार असून यामध्ये यशस्वी खेळाडूंना मेडल व सांघिक विजेता, उपविजेता व तृतीय क्रमांक यांना चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी, सदर स्पर्धेचा लाभ सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी खेळाडू यांनी घ्यावा, असे आवाहनही डॉ. बनसोडे यांनी केले आहे.