no images were found
आय.टी. पार्कच्या जागा हस्तांतरणाचा मार्ग सुकर;आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष पाठपुराव्याने एका दिवसातच औद्योगिक विकास महामंडळाने भरले रु.५ कोटी ६० लाख
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार कोल्हापूर शहर परिसरातील ई वॉर्ड येथील मौजे कसबा करवीर येथील रि.स.नं.५८३, ५८७ व ५८८ मधील कृषी विभागाच्या ताब्यातील जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना कब्जेहक्काने देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.
आय.टी.पार्कचा विषय जागेच्या दरामुळे रखडला जावू नये. तसेच सदर जागा कमीत कमी दरात उपलब्ध व्हावी, यासाठी आमदार राजेश क्षीरसागर प्रयत्नशील होते. परंतु, ३१ मार्च नंतर नवीन दराने जागेचे बाजारमूल्य सुमारे १५ % नी वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यापूर्वीच जागा हस्तांतरणाचा विषय मार्गी लावण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर सातत्याने प्रयत्नशील होते.
याकरिता सन २०२५ – २६ चे बाजारमुल्य तक्त्यातील दरानुसार सदर जमिनीचे एकत्रित मुल्यांकन र.रु.५,६०,२३,९८०/- इतके निश्चित करण्यात आले. सदर अधिमुल्याची रक्कम भरण्याची अंतिम मुदत दि.३१ मार्च २०२६ असून त्यानंतर अधिमुल्याची रक्कम नवीन सन २०२६ – २७ नुसार नवीन वार्षिक बाजार मुल्यदरानुसार भरावी लागणार असल्याचे पत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास आज दि.३० मार्च रोजी प्राप्त झाले. याबाबत संबधित विभागाने सदर बाब राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी तात्काळ मा.उद्योग मंत्री आणि सचिव, उद्योग विभाग यांच्याकडे पाठपुरावा करून सदर रक्कम तात्काळ भरण्याबाबत मंत्रालय स्तरावरून निर्देश देण्याची मागणी केली. त्यानंतर शासकीय यंत्रणा गतिमान होवून आज सायंकाळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बाजारमुल्य तक्त्यातील दरानुसार सदर जमिनीचे एकत्रित मुल्यांकन र.रु.५,६०,२३,९८०/- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाकडे जमा केले आहे. त्यामुळे आय.टी.पार्कच्या जागा हस्तांतरणाचा मार्ग सुकर झाला आहे.