no images were found
सौंदर्य विवेकातही प्रतिबिंबित व्हावे: डॉ. माया पंडित
कोल्हापूर, : सौंदर्य ही केवळ बाह्य गोष्ट नसून, ती आपल्या विचारांमध्ये आणि विवेकातही प्रतिबिंबित व्हायला हवी. आपण जे पाहतो तेच सत्य असतेच असे नाही; ‘नकाब’ आपल्याला या आभासी जगाचे भान करून देते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. माया पंडित यांनी काल (दि. २४) येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे शरण साहित्य अध्यासन, अहिल्यादेवी होळकर अध्यासन, हिंदी अधिविभाग आणि विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ओंकार वर्णे लिखित व दिग्दर्शित ‘नकाब’ या एकांकिकेचे सादरीकरण आणि त्यावर मुक्तसंवाद अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर मार्गदर्शक म्हणून, तर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वर्षा मैंदर्गी अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.
नकाब या एकांकिकेच्या सादरीकरणाचे कौतुक करताना डॉ. पंडित म्हणाल्या, शारीरिक अभिव्यक्तीचे आकर्षण क्षणिक असते; पण विचारांची खोली आणि संवेदनशीलता माणसाला खऱ्या अर्थाने सुंदर बनवते, हे ‘नकाब’ खूप प्रत्ययकारकपणे दाखवते. माध्यमांनी निर्माण केलेल्या सौंदर्याच्या साच्यांमध्ये अडकून न राहता, स्वतःची ओळख शोधणे अधिक महत्त्वाचे आहे. सौंदर्यस्पर्धा आपल्याला एक प्रतिमा देतात; पण त्या प्रतिमेपलीकडील वास्तव समजून घेणे हीच खरी जाणीव आहे. तरुणाईने बाह्य आकर्षणाच्या मोहापेक्षा विवेक, मूल्ये आणि आत्मभान यांना प्राधान्य द्यायला हवे. शरीर आणि विचार यांचा समतोल साधला, तरच व्यक्तिमत्त्व परिपूर्ण बनते. महिलांची या वस्तुकरणातून सुटका करणे हीच आजघडीची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
उपलब्ध मंचीय व्यवस्थेमध्ये उत्तम सादरीकरणाविषयी डॉ. आलोक जत्राटकर यांनी ‘नकाब’च्या चमूचे अभिनंदन केले. ते म्हणाले, सौंदर्य प्रसाधनांच्या बाजारपेठेच्या विस्तारासाठी सौंदर्यस्पर्धा साह्यभूत ठरतात. सौंदर्यस्पर्धा या केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून, त्या जागतिक भांडवलशाहीच्या बाजारपेठेचे प्रभावी साधन आहेत. सौंदर्य प्रसाधनांचा उद्योग हा अब्जावधींची उलाढाल करणारा बाजार आहे, जो ‘आदर्श सौंदर्य’ संकल्पनेची विक्री करतो. भांडवलशाही व्यवस्थेत सौंदर्य ही नैसर्गिक गोष्ट न राहता ‘उत्पादन’ बनते आणि त्याची मागणी कृत्रिमरीत्या निर्माण केली जाते. भारतीय बाजारपेठेची प्रचंड व्याप्ती लक्षात घेता, जागतिक ब्रँड्ससाठी ती एक मोठी आर्थिक संधी ठरते. माध्यमे आणि जाहिराती सौंदर्याचे विशिष्ट मापदंड तयार करतात, ज्यामुळे ग्राहकांची मानसिकता आणि खरेदीची प्रवृत्ती घडवली जाते. सौंदर्याच्या नावाखाली असुरक्षिततेची भावना निर्माण करून बाजारपेठ स्वतःची वाढ सुनिश्चित करते. आपण ‘सुंदर’ दिसण्यासाठी जे खर्च करतो, त्यामागे एक प्रचंड आर्थिक साखळी कार्यरत असते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
अध्यक्षीय मनोगतात अधिष्ठाता डॉ. वर्षा मैंदर्गी म्हणाल्या, महिला दिन हा केवळ उत्सव नसून, महिलांच्या आत्मसन्मान, समानता आणि स्वनिर्णयाच्या अधिकाराचा पुनरुच्चार आहे. सौंदर्याच्या संकल्पना बदलताना, महिलांनी स्वतःची ओळख आणि मूल्ये यांना केंद्रस्थानी ठेवणे, हेच खरे सक्षमीकरण आहे.
सुरवातीला शरण साहित्य अध्यासनाच्या समन्वयक डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जयसिंग कांबळे, प्रकाश निकम यांनी सूत्रसंचालन केले. चैत्रा राजाज्ञा यांनी आभार मानले. कार्यक्रमास सुरेश शिपूरकर, डॉ. अनमोल कोठडिया, डॉ. चैत्रा राजाज्ञा, डॉ. मच्छिंद्र गोफणे, सरला पाटील, भारती पोवार, सुरेखा आडके, विलास आंबोळे, सुभाष महाजन, चंद्रशेखर बटकडली, यश आंबोळे, स्वाती कृष्णात, रेश्मा खाडे, ॲड. अंकिता त्रिभुवने, शुभांगी चितारी, महानंदा पाटील आदी उपस्थित होते.
‘नकाब’ एकांकिकेविषयी…
ओंकार वर्णे लिखित व दिग्दर्शित ‘नकाब’ या मालिकेच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शारीर सौंदर्याच्या अशाश्वततेवर भाष्य करणाऱ्या या एकांकिकेत सौंदर्याच्या प्रचलित कृत्रिम संकल्पनांमध्ये अडकत जाऊन स्वतःचे अस्तित्व हरवून बसणाऱ्या एका तरुणीच्या स्वप्नांची ही कथा आहे. मानसी बोळुरे हिने ही मध्यवर्ती व्यक्तीरेखा खूप ताकदीने साकारली. तिच्याखेरीज यात ओंकारसह रमा घोलकर, साहिल बारस्कर, ऋतुराज पाटील, करण शेडगे, मयंक जैन आणि पवन यांनी अत्यंत चपखल भूमिका केल्या. प्रितेश पटेल यांचे पार्श्वसंगीत होते, तर पार्थ घोरपडे यांनी प्रकाशयोजना केली.