Home राजकीय अजितदादा पवार यांच्या पुतळा उभारणीसाठी जागा निश्चितीबाबत महापालिकेत आढावा बैठक

अजितदादा पवार यांच्या पुतळा उभारणीसाठी जागा निश्चितीबाबत महापालिकेत आढावा बैठक

1 min read
0
0
37

no images were found

अजितदादा पवार यांच्या पुतळा उभारणीसाठी जागा निश्चितीबाबत महापालिकेत आढावा बैठक

कोल्हापूर, : महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा कोल्हापूर शहरात भव्य पुतळा उभारण्याबाबत महापालिकेच्या पहिल्याच महासभेत ठराव मंजूर करण्यात आला होता. त्या ठरावाच्या अनुषंगाने शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अथवा इतर मुख्य रस्त्यालगत पुतळा उभारण्यासाठी योग्य जागेची निवड करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात ही बैठक पार पडली.

            महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी प्रशासनाने पुतळा उभारणीसाठी चार पर्यायी जागा सुचवाव्यात, तसेच त्या जागांची सोमवारी सकाळी सर्वांनी प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम निर्णय घेऊया, असे निर्देश दिले. महासभेत मंजूर होणाऱ्या ठरावांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः पाठपुरावा करून सदस्यांना माहिती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.       

            या बैठकीत प्रारंभी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी माहिती देताना सांगितले की, शिरोली जकात नाक्याशेजारील मुख्य रस्त्यालगतची जागा पुतळ्यासाठी सूचविण्यात आली होती. मात्र या ठिकाणी प्रस्तावित बास्केट ब्रिजचा उतार येणार असल्याने ती जागा संपादित होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालकांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

            विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी शिरोली जकात नाक्याशेजारील जागा खाजगी असून ती बास्केट ब्रिजसाठी संपादित होणार असल्याने पर्यायी जागेचा विचार करावा. शेंडा पार्क परिसरात शासनाकडून एक ते दोन एकर जागा उपलब्ध होऊ शकते का, याची पडताळणी करावी, अशी सूचना केली.

            गटनेते आदील फरास यांनी अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी किमान एक एकर जागा राखीव ठेवावी. त्या ठिकाणी म्युझियम, उद्यान तसेच अजितदादा पवार यांच्या कार्याची माहिती प्रदर्शित करता येईल. यासाठी स्वतंत्र वास्तुविशारद नेमावा तसेच या कामासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून पदाधिकारी व अधिकाऱ्यांची समिती स्थापन करावी, अशी मागणी केली.

            गटनेते मुरलीधर जाधव यांनी अजितदादा पवार यांचे कार्य भव्य असून त्यांच्या कार्याला साजेसा भव्य स्मारक उभारण्यात यावे. त्या ठिकाणी माहितीपर म्युझियम व गार्डन असावे, अशी सूचना केली.

            राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम यांनी बास्केट ब्रिजचा उतार शिरोली नाका परिसरात येणार असून पुढे अंतर्गत उड्डाणपूल प्रस्तावित आहे. त्यामुळे संबंधित जागेवर प्रत्यक्ष डिमार्केशन करून दाखवता  येईल, असे सांगितले.

            यावेळी गटनेते इंद्रजीत बोंद्रे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त स्वाती दुधाने, कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर रचनाकार एन एस पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, शाखा अभियंता अरुण गवळी, सुरेश पाटील व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पचे गोविंद बैरवा उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १…