no images were found
कोल्हापूरच्या दिव्या पाटील ने शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकासह महाराष्ट्रासही सुवर्णपदक मिळवून दिले
बेंगलोर :- ग्रीनवूड हाय इंटरनॅशनल, स्कूल, बेंगलोर मध्ये भारतीय शालेय क्रीडा महासंघाने आयोजित केलेल्या १९ वर्षाखालील मुला मुलींच्या शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमधील मुलींच्या गटात द्वितीय मानांकित महाराष्ट्र संघाने सहापैकी सहा सामने जिंकत अपराजित राहून सुवर्णपदक मिळविले. यामध्ये कोल्हापूरच्या दिव्या पाटील ने तिसऱ्या पटावर खेळताना सहा पैकी साडेपाच गुण मिळवून वैयक्तिक सुवर्ण पदक मिळविले व महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला…
मुलींच्या विजेत्या महाराष्ट्र संघात कोल्हापूरच्या दिव्या पाटील सह श्रावणी उंडाळे पुणे, अनुष्का कुतवळ पुणे, श्रुती काळे छत्रपती संभाजीनगर व देवांशी गावंडे अकोला यांचा समावेश होता. या एकोणवीस वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत देशातील ३२ संघ सहभागी झाले होते. स्विस लीग पद्धतीने एकूण सहा फेऱ्यात स्पर्धा घेण्यात आली. पहिल्या फेरीत महाराष्ट्र ने गुजरातचा चार विरुद्ध शून्य गुणांनी पराभव करून नेत्रदिपक सुरुवात केली. दुसऱ्या फेरीत आय पी एस सी संघाला महाराष्ट्राने साडेतीन विरुद्ध अर्ध्या गुणांनी नमविले. तिसऱ्या फेरीत केरळचा चार विरुद्ध शून्य गुणाने फडशा पाडून आघाडी घेतली. महत्त्वाच्या चौथ्या फेरीत अग्रमानांकित सीबीएससी ला महाराष्ट्राने साडेतीन विरुद्ध अर्ध्या गुणांनी धूळ चारून आपली आघाडी मजबूत केली. पाचव्या फेरीत तृतीय मानांकित तामिळनाडू विरुद्ध महाराष्ट्राने अडीच विरुद्ध दीड गुणाने बाजी मारत अजिंक्यपद जवळजवळ निश्चित केले. औपचारिक अंतिम सहाव्या फेरीत दुबळ्या कर्नाटकचा साडेतीन विरुद्ध अर्ध्या गुणांनी पराभव करून सर्व सहाच्या सहा सामने जिंकून महाराष्ट्राने मोठ्या दिमाखात अजिंक्यपद पटकावले व महाराष्ट्राचा मोठा दबदबा निर्माण केला.एकूण चोवीस पैकी वीस गुण महाराष्ट्राने पटकविले. त्यामध्ये कोल्हापूरच्या दिव्या पाटील व पुण्याच्या अनुष्का कुतवल ने प्रत्येकी साडेपाच गुण मिळवून सिंहाचा वाटा उचलला. छत्रपती संभाजी नगरच्या श्रुती काळे ने व पुण्याच्या श्रावणी उंडाळे ने प्रत्येकी चार गुण केले तर अकोला च्या देवांशी गावडे ने एक गुण केला.
कोल्हापूरच्या दिव्या पाटील ने यापूर्वी दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून दिले होते. दिव्या जयसिंगपूर येथील जयप्रभा इंग्लिश मेडियम ज्युनिअर कॉलेज मध्ये इयत्ता अकरावीत शिकत आहे. कॉलेजच्या प्राचार्या सौ स्मिता पाटील मॅडम व क्रीडा शिक्षक राहुल सरडे सर चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, सचिव व फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर, दिव्याची आई कविता पाटील व वडील शरद पाटील या सर्वांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले तर बुद्धिबळ प्रशिक्षक इचलकरंजीचे रोहित पोळ, कोल्हापूरचे उत्कर्ष लोमटे व सोलापूरचे सुमुख गायकवाड यांचे विशेष बुद्धिबळ प्रशिक्षण दिव्याला आजपर्यंत लाभले आहे.