no images were found
‘गाथा नवनाथांची‘ मालिकेच्या पुढील भागांत नाथ संप्रदायाची परंपरा
सोनी मराठी वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं असून नाथसंप्रदायाविषयी मिळणारी माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ या नाथांच्या कथा आणि त्यांचे महनीय कार्य प्रेक्षकांना पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरते आहे. आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत पाहायला मिळाले. यापुढेही नाथांचे वेगवेगळे चमत्कार मालिकेत पाहायला मिळतील. बाल रेवणनाथांचा नाथपंथाच्या दिशेकडील प्रवासही उत्तम सुरू आहे. अशातच मालिकेतील कलाकार नकुल घाणेकर आणि जयेश शेवलकर यांनी रेवणसिद्ध देवस्थान रेवण, सांगली येथे भेट दिली आहे. या देवस्थानी कलाकारांच्या उपस्थितीत कीर्तनकारांनी मालिकेची कथा कीर्तन स्वरूपात रसिक प्रेक्षकांना ऐकवून तल्लीन केलं. सध्या मालिकेत नवरात्र विशेष लगबग सुरू आहे. गावात सर्वत्र नवरात्र असल्याने नवरात्रीची जोरदार तयारी सुरू आहे, दुर्गेचा जागर, नवरात्र साजरी करण्यासाठी गावातील लोकांची तारांबळ उडालेली आहे. त्यात नाथ सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला रेवणनाथाला सोबत घेऊन जातात. दरम्यान आपल्याला मालिकेत दोन रेवणनाथांचे दर्शन घडणार आहे, हे लवकरच येणाऱ्या भागांत पाहायला मिळेल. ‘गाथा नवनाथांची’ मालिकेच्या पुढील भागांत नाथ संप्रदायाची परंपरा पाहायला मिळणार असून मालिकेत आता कोणते चमत्कार घडणार, अशुभ शक्तींचा नाश नाथ कसा करणार, हे पाहणे रंजक ठरेल.