no images were found
कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 6 लाख 62 हजार 930 बहिंणीकडून नोंदणी
कोल्हापूर : राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा याकरीता जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत 6 लाख 62 हजार 930 महिलांची नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या ऑनलाईन अर्जांपैकी 4 लाख 49 हजार 738 महिलांनी आपले अर्ज कार्यालयात जमा केले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या व्यापक प्रचार प्रसिद्धीमुळे तसेच 3 हजार 714 प्रशिक्षण देण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकांमार्फत शहरी व ग्रामीण भागातील महिला लाभार्थ्यांची नोंदणी अद्याप सुरु आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या योजनेत पात्र महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शन व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलेल्या नियोजनामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कोल्हापूर महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या नियंत्रणाखाली कोल्हापूर जिल्ह्यात हजारो केंद्रावर महिलांचे अर्ज जमा करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका प्रशासनाने आजपर्यंत केलेल्या कामगिरीमुळे कोल्हापूर जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर पुणे जिल्हा 9.20 लाख, नाशिक जिल्हा 6.72 अर्जांची नोंद करून दुसऱ्या क्रमांकावर आहे.
जिल्हाभरात प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत केंद्र
या योजनेच्या लाभासाठी अर्ज भरण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात हजारो नागरिकांनी नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड केले आहे. त्याचबरोबर या योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी होवू नये तसेच त्यांना कोणतीही अडचण येवू नये याकरीता जिल्हाभरात प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत केंद्र सुरु करण्यात आले आहेत. प्राप्त अर्जांची छाननी समितीमार्फत सुरू आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फेही करण्यात आले आहे. राज्य शासनाने या योजनेची गती वाढविल्याने अंमलबजावणी अत्यंत सुलभ होवून मोठ्या प्रमाणात अर्ज नोंदणी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे.
ऑनलाईन अर्ज ऑफलाईन जमा करावेत
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी स्वतः ऑनलाइन अर्ज भरले आहेत किंवा सीएससी सेंटर मध्ये फॉर्म भरलेला आहे व ज्यांनी आजपर्यंत गावामधील अंगणवाडी सेविकेकडे व शहरातील वार्ड अधिकारी यांच्याकडे ऑफलाइन कागदपत्रांसहित असलेले फॉर्म जमा केले नसतील त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडे/कर्मचाऱ्यांकडे अर्ज जमा करण्याचे आवाहन अमोल येडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी केले आहे.