no images were found
भेटा नवीन डॉ.पाल्की खुराणालाः अद्रिजा रॉयचा ‘कुंडली भाग्य’च्या कलाकारांमध्ये समावेश
झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुंडली भाग्य’ प्रीता (श्रद्धा आर्या), करण (शक्ती आनंद), राजवीर (पारस कलनावट), पाल्की (सना सय्यद) आणि शौर्य (बसीर अली) यांच्या आयुष्यातील रोचक नाट्यमय वळणांसोबत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हल्लीच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की शौर्यला तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी आणि करणच्या मालमत्तेच्या पाठी असलेल्या अंशुमनला अडकवण्यासाठी कसे करण, प्रीता आणि राजवीर हे एकत्र येतात.
रोमांचक घडामोडींमध्ये आगामी भागात नवीन डॉ.पाल्की खुराणाचा समावेश करण्यात येणार आहे. ह्या मालिकेचे चाहते गेले एक वर्षभर पाल्कीच्या रूपात लोकप्रिय अभिनेत्री सना सय्यदला पाहत असून खऱ्या आयुष्यात तिला मातृत्वाची चाहुल लागली असल्या कारणाने तिच्या जागी आता गुणी टेलिव्हिजन अभिनेत्री अद्रिजा रॉय दिसून येणार आहे. छोट्या पडद्यावरील आपल्या दमदार अभिनयासाठी मानल्या जाणाऱ्या अद्रिजाने ह्या मालिकेच्या कलाकार चमूमध्ये सामिल होण्याबद्दल आपला उत्साह व्यक्त केला.
अद्रिजा म्हणाली, “ह्या मालिकेतील लोकांनी, सहकलाकार, दिग्दर्शक, निर्मिती चमू अशा सर्वांनीच माझे छान स्वागत केले आहे. हे सगळे मेहनती लोक असून ह्या टीममध्ये सामिल होताना मी खरंच खूप उत्साहात आहे. कुंडली भाग्य हा एक आयकॉनिक शो आहे आणि ज्याप्रकारे पाल्कीची व्यक्तिरेखा लिहिण्यात आली आहे त्यामुळे ती भूमिका स्वीकारण्याची इच्छा मला झाली. आधी एखाद्या कलाकाराने साकारलेली व्यक्तिरेखा जेव्हा तुम्ही स्वीकारता, तेव्हा त्या भूमिकेचे सातत्य राखण्याचे आणि व्यक्तिरेखेच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अचानक बदल झाल्याचे प्रेक्षकांना वाटू नये याचे आव्हान तुमच्या समोर असते. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करेन आणि त्यासाठी माझे 100 टक्के देईन. प्रेक्षकांकडून मला सकारात्मक प्रतिसाद लाभेल यासाठी मी उत्सुक आहे.” आगामी भागांमध्ये डॉ.पाल्की खुराणाच्या व्यक्तिरेखेमधून अद्रिजा रॉय ह्या मालिकेत ताजा दृष्टीकोन आणि रोचक घडामोडी घेऊन येईल.