no images were found
ध्वनी-पार्श्वसंगीताने चित्रपटाच्या सौंदर्यात भर – ऐश्वर्य मालगावे
कोल्हापूर: (प्रतिनिधी ) ध्वनी संयोजन आणि पार्श्व संगीत यांच्या एकत्रित परिणामामुळे चित्रपटाच्या सौंदर्यात भरत पडते, असे मत प्रसिद्ध संगीतकार ऐश्वर्य मालगावे यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात मालगावे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ‘ध्वनी-पार्श्व संगीताचा चित्रपटातील वापर आणि तांत्रिक महत्त्व’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्हिडिओ एडिटर शेखर गुरव होते.
मालगावे म्हणाले, ध्वनी आणि पार्श्व संगीत चित्रपटातून वजा करता येत नाही. अलिकडे चित्रपटात विविध प्रकारचे साऊंड इफेक्ट वापरून चित्रपट अधिकाधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चित्रपटाचे कथानक, संवाद आदींचा विचार करून साऊंड इफेक्टचा कल्पकतेने वापर करता येऊ शकतो. प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही ध्वनी संरचना चित्रपट तयार करत असताना नीट समजून घ्याव्या लागतात.
गेल्या काही वर्षामध्ये पार्श्वसंगीतात बरेचसे नवे बदल होत असून प्रेक्षकांकडून त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटांचा प्रभाव दीर्घकाळ टिकूवन ठेवण्यासाठी पार्श्वसंगीताची मदत होते. नव्या तंत्रज्ञानामुळे काम सोपे झाले असले तरी त्यासाठी आवश्यक असणार्या तांत्रिक कौशल्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही, असेही त्यांनी नमूद केले. स्वागत व प्रास्ताविक मल्हार जोशी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.