no images were found
महसूल सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रम -जिल्हाधिकारी
कोल्हापूर : महसूल विभागाकडून 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.
महसूल सप्ताहामध्ये जिल्ह्यात 1 ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन’ साजरा करण्यात आला. जिल्हास्तर, उपविभागीय स्तरावर 26 जानेवारी ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत राबविण्यात आलेल्या महाराजस्व अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल, मुद्रांक व मोजणी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
2 ऑगस्ट रोजी “युवा संवाद हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये जिल्ह्यात 9 वी व 11 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दाखला काढण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रे, माहितीपत्रके ही इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयामध्ये शिबीरे घेवून वाटप करण्यात आली. या उपक्रमाध्ये एकूण 2 हजार 908 प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.
3 ऑगस्ट रोजी “एक हात मदतीचा” हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये पूर्व मान्सून कालावधीत अवकाळी पावसामुळे बाधीत झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली आहे. ई-पंचनामा पोर्टलवर मदत वितरणासाठी मंजुरी दिलेल्या 1 हजार 311 बाधीत शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात आली आहेत.
खरीप हंगामामध्ये पिकविमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांना 7/12 व 8 अ असे विविध दाखले वितरीत करण्यात आले. यामध्ये 13 हजार 494 हेक्टर आर खरीप पिक विमा उतरविण्यात आला आहे. खरीप पिक विमा उतरविण्यासाठी 32 हजार 340 शेतकऱ्यांना 7/12 व 8 अ दाखले वितरीत करण्यात आले.
अतिवृष्टी, पूर, नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीमध्ये घ्यावयाची काळजी यासंदर्भात जनजागृती करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये अतिदुर्गम गावामध्ये तालुका स्तरावरुन संपर्क अधिकाऱ्याची नेमणूक करुन मंडळ अधिकारी स्तरावर 119 महसूली अदालत घेण्यात आली. या अदालतीमध्ये 458 प्रकरणे निर्गत करण्यात आली असून महसूल सप्ताहात जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.