no images were found
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १४ जुलै रोजी कोल्हापूर दौऱ्यावर; पेटाळा मैदानात शिवसैनिकांचा मेळावा
कोल्हापूर :- शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १४ जुलै रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, मुख्यमंत्री शिंदे यांचा महिनाभरातच दुसरा कोल्हापूर दौरा होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील पेटाळा मैदान येथे १४ रोजी दु.४.०० वाजता शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना आणि शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
दरम्यान शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर दौऱ्याच्या अनुषंगाने उद्या बुधवार दि.१२ जुलै २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता “राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर” येथे खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटना पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि कोल्हापूरवासियांचे जिव्हाळ्याचे नाते होते. शिवसेनाप्रमुखांनी कोल्हापूरवासीयांवर विशेष प्रेम केले आणि कोल्हापूर वासियांनी अपवाद वगळता नेहमीच शिवसेनेच्या उमेदवारांना साथ देवून शिवसेनाप्रमुखांच्या प्रती आपले प्रेम दाखवून दिले. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात नेहमीच आई अंबाबाई देवीच्या दर्शनाने करणार आहेत.
शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वसा पुढे नेणारे शिवसेनेचे मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही कोल्हापूरवर व्यक्तिगत लक्ष असून, गेल्या वर्षभरात कोट्यावधी रुपयांचा निधी कोल्हापूर जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे. गेल्या महिन्यातच दि.१३ जून रोजी शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत तपोवन मैदान येथे भव्य दिव्य सभा पार पडली. त्यानंतर लगेचच येत्या १४ तारखेला ते शिवसैनिकांना मेळावा घेवून शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.
या मेळाव्यास शिवसेनेचे विविध मंत्री, खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आपल्या लाडक्या नेतृत्वाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी शिवसैनिक सज्ज असल्याचेही या पत्रकात क्षीरसागर यांनी म्हंटले आहे.