no images were found
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आणि कायद्याच्या तरतुदीमध्ये राहून निर्णय; राहुल नार्वेकर
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय दिला आहे. न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे.नार्वेकर हे लंडन दौऱ्यावर होते. ते लंडन दौऱ्यावरून मुंबईत दाखल झाले. मुंबईमध्ये पोहोचताच नार्वेकरांनी सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत आपली भूमिका मांडली आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले, “न्यायालयाने दिलेल्या निकालावर आम्ही लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहोत. हा निर्णय पूर्ण चौकशी करून कायद्याच्या तरतुदीनुसार घेतला जाणार आहे. त्यामुळे या निर्णयासाठी कोणत्याही प्रकारची घाई केली जाणार नाही आणि उशीर देखील केला जाणार नाही. आपण सगळ्यांनी चिंतामुक्त राहा, कारण जो निर्णय घेतल्या जाईल तो सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आणि कायद्याच्या तरतुदीमध्ये राहून घेतला जाणार आहे.”
विधानसभा अध्यक्षांवर दबाव निर्माण केला जात आहे, असं देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यावर उत्तर देत राहून नार्वेकर म्हणाले, “सभागृहाच्या बाहेर केलेल्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही. मी त्याकडे लक्षही देत नाही. कायद्याच्या तरतुदीनुसारच निकाल जाहीर केला जाईल.”
मी कायद्यातील तरतुदीनुसारच निर्णय घेणार, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुणाच्या मनासारखे व्हावे म्हणून निर्णय घेणार नाही. १५ दिवसांत प्रक्रिया पूर्ण झाली तर १५ दिवसांत निर्णय घेऊ, प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब लागला, तर निर्णय घेण्यास विलंब होईल, असे सूचक विधान नार्वेकरांनी यावेळी केले.