no images were found
अमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील कोल्हापुरात; ‘त्या’ वक्तव्यावरून नाराजी?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येत असताना त्यांच्या सगळ्यात जवळचे भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील मात्र कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत.त्यामुळे अमित शाह यांची चंद्रकांत पाटील यांच्यावरची नाराजी अजूनही कायम आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, अमित शाह आज संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहेत, तर उद्या 16 एप्रिल रोजी नवी मुंबईत त्यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
चंद्रकात पाटील यांनी बाबरी मशीद विद्ध्वंसाप्रकरणी वक्तव्य केलं होतं. यावेळी बाबरी मशिद पाडण्यात शिवसैनिक नव्हते, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. परंतु त्यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटासह ठाकरे गटाच्या आमदारांकडून जोरदार टीका झाली. पाटलांनी हे वक्तव्य करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला, असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला.
दरम्यान या वादानंतर चंद्रकांत पाटील यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांच्याशी मी स्वत: फोनवरुन बोलून गैरसमज दूर करेन, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपचे काही नेते नाराज असल्याच्या चर्चा आहे. त्यासोबत भाजप नेते आशिष शेलार यांनी अमित शाह यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी ते वक्तव्य टाळायला हवं होतं, असं म्हटलं होतं. त्यातच आता अमित शाह यांच्या नवी मुंबईच्या दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील कोल्हापुरात असल्याने चर्चा सुरु झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा हा परिणाम म्हणायचा का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.