no images were found
स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका मन धागा धागा जोडते नवा…
मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग सादर करत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी स्टार प्रवाह वाहिनी लवकरच घेऊन येतेय नवी मालिका मन धागा धागा जोडते नवा. मुलगी झाली हो, रंग माझा वेगळा, आई कुठे काय करते यासारख्या मालिकांमधून स्टार प्रवाहने वेगळा विषय हाताळत मनोरंजन विश्वात नवा प्रयोग केला आणि तो यशस्वीही झाला. मन धागा धागा जोडते नवा ही मालिका घटस्फोट या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणार आहे.
या नव्या प्रयोगाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘स्टार प्रवाहने आजपर्यंत नेहमीच ज्वलंत आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना घेऊन वेगवेगळ्या मालिका बांधल्या आहेत आणि त्या रसिकांसमोर सादर केल्या आहेत. या कथा आणि ही पात्र रसिकांना आवडण्यामागचं कारण हेच आहे की त्या खऱ्या वाटतात आणि तो प्रवास एक नवी ऊर्जा देतो. आई कुठे काय करते, मुलगी झाली हो, रंग माझा वेगळा या मालिका एक उत्तम उदाहरण आहेत. अश्याच एका महत्त्वाच्या विषयावर आता स्टार प्रवाह वाहिनी मालिका घेऊन येतेय आणि तो विषय आहे घटस्फोट, एका मुलीचा घटस्फोट. घटस्फोट हा कोणत्याही गोष्टीचा शेवट नाही. आयुष्याच्या प्रवासात या एका अपघातानंतर बराच प्रवास असतो जो सहज सुखकर असू शकतो हे दाखवणारी ही मालिका आहे. प्रत्येक घटस्फोटित मुलासाठी, मुलीसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मन धागा धागा जोडते नवा ही मालिका एक प्रेरणादायी मालिका असेल याची आम्हाला खात्री आहे.’
स्टार प्रवाहच्या मुलगी झाली हो मालिकेतून घराघरात पोहोचलेली माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या मन धागा धागा जोडते नवा या नव्या मालिकेत दिव्या आनंदी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.