no images were found
जिल्हा नियोजनच्या निधीचे समान वाटप करावे : काँग्रेस आमदारांची मागणी
कोल्हापूर :जिल्हा नियोजन समिती मधून देण्यात येणाऱ्या निधीचे लोकप्रतिनिधींना समान वाटप करावे अशी मागणी काँग्रेसच्या चार आमदारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली.या शिष्टमंडळात आ.ऋतुराज पाटील आ. जयंत आसगावकर, आ.जयश्री जाधव,आ.राजूबाबा आवळे यांचा समावेश होता .
शेजारच्या जिल्ह्यात निधीचे वाटप झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप याबाबत कोणतीही हालचाल झाली नसल्याचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. ही बाब पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निदर्शनास आणून द्यावी. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या आमदारांना समान पद्धतीने वाटप होण्याबाबत पालकमंत्री यांचेकडून मार्गदर्शन घेऊन त्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली.आमदारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना दरवर्षी निधी देण्यात येतो. हा निधी वाटप करत असताना सर्व लोकप्रतिनिधींना समान पद्धतीने निधी वाटप होणे अपेक्षित असते पण यावेळी निधी वाटप करत असताना वेगळे सूत्र अवलंबिण्यात येणार असल्याचे वृत्तपत्रातील बातमीतून आमच्या वाचनात आले आहे .या बातमीनुसार मुख्यमंत्री शिंदे गट 40 टक्के , भाजप 40 टक्के, पालकमंत्री 10 टक्के व उर्वरित 10 टक्के निधी विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे .
कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे सहा तर राष्ट्रवादीचे दोन असे विरोधी पक्षाचे एकूण आठ आमदार आहेत. तर सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाचे दोन आमदार आहेत. जर वरील सूत्रानुसार निधी वाटप केले तर 90% निधी हा दोन आमदार असलेल्या गटांना आणि केवळ 10 टक्के निधी हा आठ आमदार असलेल्या विरोधी गटाला मिळेल. ही गोष्ट म्हणजे जिल्ह्यातील विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींवर होणारा अन्याय असेल. त्यामुळे विकासकामे कशी करायची ? हा प्रश्न निर्माण होतो.
या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना समान निधी वाटप करण्याचे सूत्र अवलंबण्यात यावे. दरम्यान निधी वाटपाबाबत असे कोणतेही सूत्र अद्याप ठरलेले नसून आपली ही मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यापर्यंत पोहोचवू, असे आश्वासन जिल्हाधिकारी रेखावर यांनी शिष्टमंडळाला दिले.