
no images were found
शेफ रणवीर ब्रारने दिले होमकुक्सना बेन्टो बॉक्स बनवण्याचे आव्हान
मास्टरशेफ इंडियाची वाटचाल फिनालेकडे सुरू झाली आहे. शेफ्स रणवीर ब्रार, गरिमा अरोरा आणि विकास खन्ना टेस्ट, इनोव्हेशन आणि प्रेझेंटेशन या निकषांवर स्पर्धकांची पारख करत आहेत आणि या मंगळवारी स्पर्धकांना देण्यात आलेले बेन्टो बॉक्स बनवण्याचे आव्हान स्पर्धकांसाठी खूप कठीण असणार आहे. होम कुक्स जेव्हा मास्टरशेफ इंडिया किचनमध्ये प्रवेश करतील, तेव्हा त्यांना शेफ रणवीर ब्रार काही तरी खास बनवताना दिसेल. शेफ रणवीर ब्रार एक बेन्टो बॉक्स तयार करताना दिसेल. बेन्टो बॉक्स म्हणजे एक जपानी टिफिन बॉक्स. आजचा चॅलेंज आकर्षक तर आहेच पण अवघड देखील आहे. डबा भरताना हे लक्षात ठेवायचे की, मुलाला संतुलित आहार मिळेल आणि त्याचबरोबर ते पदार्थ आकर्षक आणि चविष्ट तर असलेच पाहिजेत.
होमकुक्ससाठी आव्हान हे असेल की, त्यांना 60 मिनिटांत बेन्टो बॉक्स तयार करावा लागेल. यावेळी कमलदीप कौर सांगेल की, आपल्या मुलांना डब्यात नेहमी काही ना काही नवीन देण्याचा तिचा कसा प्रयत्न असतो. प्रियंका आणि शांतामध्ये तर मजेशीर चुरस होताना दिसेल, कारण त्या दोघी एकच डिश बनवायचे ठरवतात. आदल्या दिवशीच्या आव्हानात परफॉर्मन्स चांगला नसल्याने या चॅलेंजमध्ये चांगली कामगिरी करण्याबाबत सुवर्णा आणि अविनाश यांच्यावर जास्तच दडपण असेल.आपला अनुभव सांगताना सुवर्णा म्हणाली, “ह्या चॅलेंजमुळे मी बावचळून गेले होते, पण मला ही जाणीव होती की, परीक्षकांच्या नजरेत पुन्हा आपली प्रतिमा उजळण्यासाठी आपल्याला चांगली कामगिरी करणे भाग आहे. मास्टरशेफ इंडियाबाबत एक गोष्ट मला फार आवडते, ती म्हणजे अनेक प्रकारच्या पाककृती करण्याची, त्याबाबत प्रयोग करण्याची संधी आम्हाला मिळते. त्यामुळे माझ्यावर जरी दडपण असले, तरी मी या आव्हानाचा आनंद घेतला.”