no images were found
पुष्पप्रदर्शनाऐवजी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सहकार्याने गार्डन्स क्लब चा अनोखा कार्यक्रम ; तीन जपानी पाहुण्यांची प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर (प्रतीनिधी):- एल निनोच्या प्रभावामुळे अपुरा पाऊस यामुळे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सरासरीच्या ५१.९% पावसाची नोंद झालेली आहे. या पार्श्वभूमीवर गार्डन्स क्लबने खूप विचारपूर्वक वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन व आखणी केलेली आहे. दरवर्षी गार्डन्स क्लबतर्फे खाजगी बागा, कारखाने, संस्था व सार्वजनिक आणि त्यांच्या आकारमानाप्रमाणे उपविभाग अशा जवळ जवळ ३० प्रकारांमध्ये उद्यान स्पर्धा घेतल्या जातात. या वर्षी बागेच्या स्पर्धा ऐवजी नोंदणी केलेल्या बागांना भेटी देण्यात येतील. आणि सहभागी सर्व स्पर्धकांचे विशेष कौतुक ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक कार्यक्रमात करण्यात येईल. त्याचप्रमाणे दरवर्षी गार्डन्स क्लब कोल्हापूर व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पुष्प प्रदर्शन व स्पर्धा आयोजित केली जाते. पण पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे रोपवाटिका, फुलोत्पादक, ग्रीन हाऊस चालक या सर्वांच्याच उत्पन्नाला फटका बसलेला आहे. म्हणून पुष्प स्पर्धा न घेता तसेच तीन दिवसाचा मोठा शो बागेत न घेता ५ डिसेंबर रोजी एक दिवसाचा कार्यक्रम घेण्यात येईल.
यातील प्रमुख आकर्षण म्हणजे तीन जपानी पाहुण्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती गार्डन क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, महापौर रूपाराणी निकम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमधे होणाऱ्या या कार्यक्रमात योहेई हिसाशी, गेन्या टेकेडा, आकिरा निशिओ हे सकाटा या फुलोत्पादक कंपनीचे पदाधिकारी जपानहून व सारंग कीर्तने व हालेश सी हे सकाटा चे भारतातील पदाधिकारी या कार्यक्रमासाठी येत आहेत.
यावेळी गार्डन्स क्लबच्या कॅलेंडर व रोजेट वार्षिकाचे प्रकाशन, उद्यान स्पर्धेमधील सहभागींचा सत्कार व सकाटा या कंपनीचे सादरीकरण पहिल्या सत्रात होईल. आणि दुसऱ्या सत्रामधे लघुपट स्पर्धेचे स्क्रीनिंग आणि १५ इकेबाना पुष्प रचनेचे प्रत्यक्ष सादरीकरण भारतीय वाद्यांच्या पार्श्वसंगीतावर करण्यात येईल.
पुष्प स्पर्धा व प्रदर्शन याचा निधी हा वर्षभर कोल्हापूर जिल्ह्याच्या जलव्यवस्थापनासाठी कोल्हापूर महानगर पालिकेच्या मार्गदर्शनाखाली वापरला जाईल.
गार्डन्स क्लबतर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या रोजेट या वार्षिकाची संकल्पना ही संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत
(UNEP) जागतिक पर्यावरण दिन २०२६ च्या हवामान कृती (Climate Action) वर आधारित आहे. तर वार्षिक कॅलेंडर संयुक्त राष्ट्र आम सभेच्या शाश्वत आणि लवचिक पर्यटन या संकल्पने वर आधारित आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची पदाधिकाऱ्यांची भक्कम साथ यामुळे इतकी वर्ष अव्याहतपणे चालू असलेले प्रदर्शन या वर्षी न भरवण्याच्या निर्णयाचे सर्व नागरिक स्वागतच करतील आणि येणाऱ्या पाणी टंचाईवर उपाय योजना करण्यात महानगरपालिका व गार्डन्स क्लबला साथ देतील अशी अपेक्षा महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड आणि गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेस उपमहापौर अक्षय जरग, गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सचिव सुप्रिया भस्मे, वर्षा वायचळ, डॉ. रचना संपत कुमार, सल्लागार समिती सदस्य रविंद्र साळुंखे आदी उपस्थित होते.