no images were found
संघर्ष, कला आणि सेवाभावाचा संगम म्हणजे सागर बगाडे! त्यांच्या कलेला महाराष्ट्रभर व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – चंद्रकांतदादा पाटील
कोल्हापूर : राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक सागर बगाडे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, विनोदकुमार लोहिया, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, श्री. राहुल चिकोडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. आमदार कौस्तुभ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मास्तरप्रेमी मंचच्या वतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सागर बगाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करून त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षक आमदार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करताना सागर बगाडे यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, सागर बगाडे हे केवळ एक आदर्श शिक्षक नाहीत, तर शिक्षणाच्या पलीकडे जाऊन समाजाशी नाळ जोडणारे, कलेची आवड जपणारे आणि युवाशक्तीला विधायक दिशा देणारे व्यक्तिमत्त्व आहे. शिक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडतानाच त्यांनी विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात आनंद, उत्साह आणि सकारात्मकता निर्माण केली आहे. चंद्रकांतदादा पाटील हे सत्तेचा उपयोग समाजातील शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी करणारे संवेदनशील नेतृत्व आहे. त्यांच्या राजकीय प्रवासापेक्षा समाजासाठी केलेले कार्य, सर्वसामान्यांशी जपलेले माणुसकीचे नाते आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची वृत्ती अधिक प्रेरणादायी आहे. अशा नेतृत्वाच्या उपस्थितीत सागर बगाडे यांच्या कार्याचा गौरव होणे ही आनंदाची बाब असल्याचे आमदार गावडे यांनी नमूद केले.
आपल्या मनोगतात चंद्रकांतदादा पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या विकासकामांचा आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रातून देशाच्या विकासासाठी योगदान देणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी सागर बगाडे यांच्या पुढील सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सागर बगाडे यांनी आपल्यातील कला केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता तिचे जतन, संवर्धन आणि प्रचार-प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रभर प्रवास करावा. आपल्या कलेच्या माध्यमातून नव्या पिढीला प्रेरणा द्यावी आणि देशाच्या विकासप्रक्रियेत योगदान द्यावे, असे आवाहन चंद्रकांतदादांनी केले. यासाठी सागर बगाडे यांच्या महाराष्ट्रभर होणाऱ्या प्रवासाचा संपूर्ण खर्च पक्षाच्या वतीने उचलण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
खासदार धनंजय महाडिक यांनीही सागर बगाडे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. युवाशक्तीच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत सेवाभावी वृत्तीने विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक उपक्रम राबविले आहेत. जन्माष्टमी फुगडी स्पर्धा, दहीहंडी, चित्रकला स्पर्धा, बी न्यूज यांसारख्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा विशेष सहभाग आणि पुढाकार असतो. युवकांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि समाजात सांस्कृतिक चैतन्य निर्माण करणे, ही त्यांची कार्यपद्धती निश्चितच कौतुकास्पद आहे. शिक्षक म्हणून केलेली सेवा आणि सेवेनंतरही समाजासाठी कार्यरत राहण्याची त्यांची भूमिका नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना सागर बगाडे यांनी आपल्या जीवनप्रवासातील संघर्ष, जडणघडण आणि वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “मी शून्यातून प्रवास केला आहे. आज माझ्याकडे जे काही आहे, त्यामागे मला घडविणाऱ्या माणसांचे आशीर्वाद आणि प्रेम आहे. ज्यांनी मला घडवले, तीच माझी खरी संपत्ती आहे आणि विद्यार्थ्यांनी दिलेले प्रेम हीच माझ्या आयुष्याची शिदोरी आहे.” आपल्या सांस्कृतिक जीवनाची खरी सुरुवात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतून झाली. या संस्थेने मला केवळ काम करण्याची संधी दिली नाही, तर माझ्यातील कलागुणांना विकसित होण्यासाठी योग्य वातावरण आणि व्यासपीठ उपलब्ध करून दिले. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. आदरणीय प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे आणि डॉ. श्रुती जोशी यांनी मला लहान भावाप्रमाणे प्रेम व आपुलकी दिली. या सर्वांच्या सहवासातून आणि मार्गदर्शनातून माझ्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढील वाटचालीत चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगताना त्यांनी या सर्व मान्यवरांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आणि पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आयुष्यात मिळवलेले यश हे केवळ स्वतःचे नसून आपल्याला घडविणाऱ्या संस्था, शिक्षक, विद्यार्थी, सहकारी आणि हितचिंतकांचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या सोहळ्यातून सेवापूर्ती हा केवळ शासकीय सेवाप्रवासाचा समारोप नसून समाजासाठी नव्या जोमाने कार्य करण्याची सुरुवात आहे, हा प्रेरणादायी संदेश अधोरेखित झाला. शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करताना कलेची, संस्कृतीची आणि समाजसेवेची मशाल हाती घेणाऱ्या सागर बगाडे यांच्या पुढील वाटचालीस उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन मास्तरप्रेमी मंचच्या वतीने करण्यात आले होते. शिक्षक, शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.