no images were found
सामाजिक वंचितता व समावेशानावर विद्यापीठात विचारमंथन : महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त ‘पहिली सामाजिक समावेशन गोलमेज परिषद संपन्न
कोल्हापूर, : महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित ‘पहिली सामाजिक समावेशन गोलमेज परिषद’ आज शिवाजी विद्यापीठात पार पडली. ‘सामाजिक वंचितता व समावेशन : संकल्पना, सिद्धांत आणि व्यवहार’ हा या परिषदेचा मुख्य विषय होता. सामाजिक वंचिततेची ऐतिहासिक कारणे, तिचे बदलते स्वरूप, भारतीय समतावादी विचारपरंपरा आणि सामाजिक समावेशनाच्या धोरणात्मक व व्यावहारिक पैलूंवर या परिषदेत विचारमंथन करण्यात आले.
या परिषेदेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना डॉ. कामत म्हणाले, सामजिक समावेशनाचे सिद्धांत आणि धोरण हे वंचितता नष्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण असून आता ती प्रत्यक्ष व्यवहारात उतरविणे आवश्यक बनले आहे. यावेळी श्री. सिद्धार्थ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. एम. के. भानारकर यांनी याप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक केले. श्री. अविनाश भाले यांनी आभार मानले. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सत्यशोधक, समतावादी आणि परिवर्तनवादी विचारांचा समकालीन सामाजिक वास्तवाशी संवाद घडवून आणणे, हा या परिषदेचा प्रमुख उद्देश होता. भारतीय समाजातील जातीय विषमता, स्त्री-पुरुष असमानता, शैक्षणिक व आर्थिक विषमता आणि विविध वंचित समूहांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचा व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
परिषदेच्या पहिल्या सत्रात ‘सामाजिक वंचितता व समावेशन : संकल्पना, सिद्धांत आणि ऐतिहासिक संदर्भ’ या विषयावर चर्चा झाली. प्राचार्य डॉ. हरीश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्रात ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर, शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक प्रा. डॉ. पी. एस. कांबळे आणि डॉ. शरद गायकवाड यांनी आपली मांडणी केली. सामाजिक वंचिततेची संकल्पना, तिची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि भारतीय समाजातील विषमतेची संरचनात्मक कारणे या अनुषंगाने विचारांची देवाणघेवाण झाली.
दुसऱ्या सत्रात ‘फुले विचार आणि भारतीय समतावादी विचारपरंपरा’ या विषयावर चर्चा झाली. या सत्रात डॉ. दशरथ पारेकर, प्रा. डॉ. भारती पाटील आणि डॉ. अरुण शिंदे यांनी आपले विचार मांडले. महात्मा फुले यांच्या विचारांचे सामाजिक परिवर्तनातील योगदान, भारतीय समतावादी परंपरेचे महत्त्व आणि समकालीन समाजातील त्यांची उपयुक्तता या विषयांना चर्चेत महत्त्व देण्यात आले.
तिसऱ्या सत्रात ‘धोरणे, व्यवहार आणि सामाजिक समावेशनाचे भवितव्य’ या विषयावर विचारमंथन झाले. ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजेंद्र कुंभार, सामाजिक कार्यकर्ते कॉ. संपत देसाई आणि सामाजिक विचारवंत हमायु मुरसल यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली. सामाजिक न्याय, सार्वजनिक धोरणांची अंमलबजावणी, वंचित घटकांचे प्रतिनिधित्व आणि सामाजिक समावेशन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना यांसारख्या मुद्द्यांचा या सत्रात ऊहापोह करण्यात आला.
परिषदेच्या समारोपप्रसंगी सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. एम. के. भानारकर यांनी सामूहिक निष्कर्ष व शिफारसींची मांडणी केली. सामाजिक वंचिततेचे आकलन केवळ सैद्धांतिक पातळीवर न ठेवता ते प्रत्यक्ष सामाजिक वास्तव, घटनात्मक मूल्ये आणि सार्वजनिक धोरणांशी जोडण्याची आवश्यकता या परिषदेच्या विषयातून अधोरेखित झाली. परिषदेच्या आयोजनामागील उद्दिष्टांनुसार विविध अभ्यासक, संशोधक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात वैचारिक संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या परिषदेत डॉ. गिरीश मोरे , प्रा. डॉ. कैलास अंबुलगेकर, डॉ. दीपा श्रावस्ती, डॉ. विनोद पवार , डॉ. पवनकुमार गायकवाड, डॉ. चंद्रकांत कुरणे, प्रा. डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. शरद बनसोडे, डॉ. विवेक धुपदाळे, डॉ. डॉ. भरत नाईक, विद्यानंद खंडागळे , प्रा. डॉ. चेतना सोनकांबळे , प्रा. डॉ. निशा पवार, डॉ. शिवाजी जाधव, प्रा. डॉ. तृप्ती करीकट्टी, डॉ. माधव भिलावे, डॉ. किरण पवार, डॉ. श्रीपाल गायकवाड, डॉ. उदय पाटील , प्रा. डॉ. मच्छिंद्र गोफणे, प्रा. डॉ. रामचंद्र पवार, डॉ. अनमोल कोठडिया, डॉ. किशोर खिलारे, शरद पाटील, विश्वजित गुरव आदींसह विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, संशोधक यांचा सहभाग होता.