no images were found
लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतलं जीवा-नंदिनीचं जगावेगळं डोहाळे जेवण
स्टार प्रवाहच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत सध्या नात्यांमधील भावभावनांचे अनेक पदर उलगडताना दिसत आहेत. चिमुकल्या कथाला सांभाळताना पार्थ आणि काव्याची होणारी धावपळ, तर दुसरीकडे आपल्या आयुष्यात चिमुकल्या पावलांचं आगमन व्हावं या प्रतीक्षेत असलेले जीवा आणि नंदिनी. या दोन्ही गोष्टींमधून मालिकेत एकीकडे पालकत्वाची जबाबदारी तर दुसरीकडे मातृत्वाची ओढ पाहायला मिळतेय.
जीवा आणि नंदिनीचं बाळ आर्याच्या पोटात वाढत असलं, तरी या बाळाच्या आगमनाची ओढ नंदिनी आणि जीवालाही तितकीच आहे. कारण मातृत्वाची भावना ही केवळ जन्म देण्यापुरती मर्यादित नसून ती प्रेम, माया, जिव्हाळा आणि मनाने जोडल्या गेलेल्या नात्यांमधूनही फुलत असते. आईपणाचं डोहाळेजेवण होतं…पण बाप होण्याचा सोहळा होत नाही..याच भावनेतून देशमुख कुटुंबाने आर्यासोबतच जीवा आणि नंदिनीचंही डोहाळे जेवण करण्याचा निर्णय घेतला आहे. मातृत्वाच्या या वेगळ्या रूपाचा आणि नात्यांमधील प्रेमाचा अनोखा सोहळा प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे.
या खास प्रसंगासाठी लेखिका अश्विनी शेंडे हिने खास कविता केली आहे.
आई…माती, उब अन खूप काहीबाही.. बाप फक्त कुंपण, सतत टोचत राही..
पण तुमचा कोवळा पाला हे कुंपणच जपतं
तुमची फुलं, तुमचं शेत याच्याच खांद्यावर बहरतं
लेकांचं घर राखता राखता बाप नावाचं कुंपण घराबाहेरच राहून जातं
आता मी थकलोय खरा अन रुसलोही होतो जरा जरा
पण मीही सोडून देईन म्हणतो, तुम्हीही झालं गेलं थोडं विसरा
आता तुम्हीही बाप व्हाल, पाठीवरची थाप व्हाल
आशीर्वाद वाटून टाकाल, लेकरांवरचा शाप न्याल
तुम्हीही थकाल तुम्हीही रुसाल
आतलं रडू पचवून पोरांचे डोळे पुसाल..
आभाळासारखा असतो बाप, तरी कधी मोकळा होत नाही….
आईपणाचं डोहाळेजेवण होतं…
पण बाप होण्याचा सोहळा होत नाही… ही भावस्पर्शी कविता मालिकेत जीवाचे बाबा जीवासाठी सादर करणार आहेत.
मराठी मालिका विश्वात पहिल्यांदाच अशा अनोख्या पद्धतीने डोहाळे जेवणाचा सोहळा साजरा होताना पाहायला मिळणार आहे. नात्यांची सुंदर वीण उलगडणारा हा खास सोहळा पाहायला विसरू नका फक्त स्टार प्रवाहवर.