no images were found
गरोदरपणात महिलांच्या एचआयव्ही चाचणीसोबत काविळ चाचणीही प्राधान्याने व्हावी – जिल्हाधिकारी
कोल्हापूर : एड्स नियंत्रण कार्यक्रमामध्ये मिशन एड्स सुरक्षा अंतर्गत कोल्हापूर जिल्हा संघर्षशील वर्गातून सक्षम कॅटेगरीमध्ये गेलेला आहे. याकरिता राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातील सर्व घटकांचे योगदान लाभले असून राज्यातील सुरक्षित प्लस वर्गवारी गाठण्यासाठी प्रत्येक गरोदर महिलेची एच.आय. व्ही सिफिलिस व कावीळ तपासणी करणे अत्यावश्यक असून ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या तपासण्या करण्यात याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा एड्स नियंत्रण समितीच्या त्रैमासिक बैठकीमध्ये ते बोलत होते.
ते म्हणाले , जिल्ह्यातील ट्रान्सजेंडरना मतदान ओळखपत्र, रेशनकार्ड मिळण्यास येणारे अडथळे लवकरच दूर केले जातील. याबाबतची यादी प्रशासनाकडे देण्यात यावी तसेच आरोग्य विभागाकडून गुप्तरोग तपासण्यांवर भर दिला गेल्यामुळे गुप्तरोग संशयित येण्याचा आकडा वाढला आहे.अशा वेळेस निदान होण्याकरता तातडीने पुढील तपासण्या करणे गरजेचे आहे. त्या विनाविलंब सर्व रुग्णालयांमध्ये व्हाव्यात अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी जिल्ह्यातील एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा देताना एड्स नियंत्रण कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा संघर्षशील वर्गामधून सक्षम वर्गामध्ये गेला असून सुरक्षित वर्गामध्ये जाण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सांगितले.
युवा दिन मॅरेथॉन स्पर्धेत मुले-मुलींच्या गटांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे स्पर्धक हे राज्यांमध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय आले असून पटना (बिहार) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी या स्पर्धकांची निवड झाल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनंदा गायकवाड यांनी दिली . यावेळी देश पातळीवर राबविल्या गेलेल्या रिस्क असेसमेंट अभियानामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यामध्ये प्रथम आल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री राठोड यांनी कोल्हापूर जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी क्षयरोग,संपूर्ण सुरक्षा केंद्र,ए आर टी सेंटर,स्थलांतरित कामगारां साठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आर्दीचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक, अ. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. व्ही. बर्गे , शहर क्षयरोग अधिकारी डॉ. रूपाली यादव, क्लस्टर प्रोग्राम ऑफिसर रमेश वर्धन यांच्यासह एआरटी सेंटरचे वैद्यकीय अधिकारी,स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी,आयसीटीसी सुरक्षा केंद्र समुपदेशक आदी उपस्थित होते.