no images were found
एमपीएससी’ विद्यार्थ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे-हेमंत पाटील : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सुधारणांसाठी ‘देवाभाऊ’ कटिबद्ध
पुणे:महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या आरोपांवरून पुण्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेत महायुती सरकारने उचललेली पावले ही युवकांच्या भविष्याबाबत सरकारची सकारात्मक भूमिका स्पष्ट करणारी आहेत, असे मत भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी मंगळवारी (ता.१३) व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत संवेदनशील आहे.एमपीएससीमधील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणे आणि सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची समितीच्या सचिवपदी नियुक्ती करणे, हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. चौकशी निष्पक्षपणे होऊन दोषींवर नियमानुसार कारवाई होईल तसेच भविष्यात अशा प्रकारांवर आळा असेल, असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला.
पुढील तीन वर्षांत ७० हजार पदांची भरती, गट-क परीक्षेतील पदसंख्या वाढविणे तसेच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या निर्णयांमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो युवकांना दिलासा मिळण्याची आशा आहे.
“विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करणे, भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि गुणवत्तेला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. एमपीएससी सारख्या संस्थांची विश्वासार्हता अधिक बळकट झाल्यास महाराष्ट्रातील तरुणांना न्याय्य संधी मिळतील. महायुती सरकार युवकांच्या भविष्याच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.