no images were found
लोकप्रतिनधींचा विकासनिधी रोखून जनतेला वेठीस धरणे थांबवा-हेमंत पाटील:भाजप-राष्ट्रवादीच्या राजकीय भांडणाचा फटका पुणेकरांना
पुणे,: राज्यातील विद्येचे माहेघर असलेल्या पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आता थेट पुणेकरांच्या विकासाच्या आड येत असल्याचा गंभीर आरोप भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.२१) केला . नगरसेवकांच्या राजकीय भूमिकेवरून विकासनिधी शून्य केला जात असेल, तर हा प्रकार केवळ राजकीय सूड नाही, तर सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यानंतर सुहास टिंगरे यांचा विकासनिधीही शून्य करण्यात आल्याची बाब गंभीर आहे. विशेष म्हणजे, भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कामाचे ऑडिट व चौकशी करण्याच्या प्रस्तावाला टिंगरे यांनी अनुमोदन दिले होते. त्यानंतर निधी शून्य झाल्याने राजकीय दबावाचा संशय अधिक बळावतो, असे पाटील म्हणाले.
मात्र, “राजकीय नेत्यांच्या भांडणाचा हिशेब पुणेकरांनी का चुकवायचा?” असा थेट सवाल पाटील यांनी केला. “विकासनिधी हा कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मर्जीवर चालणारा खाजगी निधी नाही. तो नागरिकांच्या करातून आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध होतो. राजकीय मतभेद असतील तर ते सभागृहात मांडा; पण रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवे आणि इतर नागरी कामांचा निधी रोखून जनतेला शिक्षा देणे हा लोकशाहीचा अपमान आहे,” अशी भावना तीव्र शब्दात पाटील यांनी व्यक्त केल्या.
मुळात कुठल्याही शहरातील लोकप्रतिनिधींचा विकासनिधी रोखणे हे न्याय हक्काच्या विरोधात आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षात पुणेकरांच्या विकासाची कोंडी होत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. राजकीय सूडासाठी जनतेच्या विकासाचा गळा घोटणे बंद करा, अन्यथा भारत अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून या निर्णयाविरोधात तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.