no images were found
मौजे सांगावचे आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय उपचारा संदर्भात देशात अव्वल ठरेल – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ:
येथे केंद्र सरकारचे आयुर्वेद एम्स आणि फिजिओथेरपी सेंटर उभारण्याचा संकल्प
कोल्हापूर (कागल) :-+ येथील आयुर्वेदिक महाविद्यालय व त्याच्याशी संलग्नित रुग्णालय हे उपचारा संदर्भात संपूर्ण देशात अव्वल ठरेल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. मौजे सांगाव येथे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय संलग्नित रुग्णालयाचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत,कागल नगराध्यक्ष सविता माने, पंचायत समिती सभापती सुवर्णा पाटील,उप सभापती डॉ. इंद्रजीत पाटील,तहसीलदार अमरदीप वाकडे,मुख्याधिकारी डॉ.अजय पाटणकर, गोकुळचे माजी संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने,गोकुळचे माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ,डॉ अजय चंदनवाले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सदानंद भिसे, शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अभिजीत अहिरे प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री मुश्रीफ पुढे म्हणाले,कोल्हापूर या ठिकाणी सीपीआरचे नूतनीकरण त्याचबरोबर शेंडा पार्क येथे सुरु असलेल्या विविध रुग्णालये तसेच कागल येथील आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयामुळे कोल्हापूर हे मेडिकल हब म्हणून उदयास येईल. कर्नाटकातील बेंगलुरुऐवजी रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतील असेही ते म्हणाले. या विविध रुग्णालयामुळे पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा सीमा भागातील लोकांची मोठी सोय होणार असल्याचे सांगून कागल येथे सुरू होणारे हे रुग्णालय देशात उत्कृष्ट रुग्णालय ठरेल असे ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.तसेच ९ ऑगस्ट रोजीच्या मुख्यमंत्री महोदयांच्या संभाव्य दौऱ्याची तयारी कागल नगरपालिकेने आत्तापासूनच करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.याप्रसंगी मुश्रीफ यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्यशैलीला उजाळा दिला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन केले .
सुमारे 240 कोटी रुपये खर्च करून 12 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयाचा सातबारा उतारा तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी मुश्रीफ यांच्याकडे सुपूर्त केला .तो त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ अभिजीत अहिरे यांना दिला.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नवल बोते, श्रीनाथ समूहाचे चंद्रकांत गवळी,अस्लम मुजावर, प्रवीण काळबर, अर्जुन नाईक, संजय चितारी, विवेक लोटे,नवाज मुश्रीफ, महेश चौगुले यांच्यासह महाविद्यालयाचे विभाग प्रमुख,डॉक्टर्स,नर्सेस ग्रामस्थ आदी उपस्थित होते.