no images were found
थकीत भाडे न भरलेल्या सहा गाळ्यांना महापालिकेचा सील
कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परवाना व इस्टेट विभागाने आज महापालिकेच्या मुख्य इमारतीतील महात्मा गांधी मार्केटमधील व्यावसायिक संकुलात विशेष मोहीम राबवून थकीत इस्टेट भाडे असलेल्या सहा गाळ्यांवर सील करण्याची कारवाई केली.
महापालिकेकडून संबंधित गाळेधारकांना यापूर्वीच थकीत भाडे भरण्याबाबत नोटीस व लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, सूचना देऊनही संबंधितांनी थकबाकीची रक्कम न भरता व्यवसाय सुरू ठेवल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली. तसेच काही गाळेधारकांनी आपले गाळे इतरांना भाड्याने दिल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावरही गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली.
सदरची मोहीम उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त राम काटकर, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, परवाना अधीक्षक अशोक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी इस्टेट विभागाचे रविंद्र काळे, संदीप भोई, कल्पना शिरदवाडे, प्रथमेश पवार आणि भोला पाटणकर उपस्थित होते.
महापालिकेने यापुढेही थकबाकीदारांवर अशीच कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला असून आवश्यकतेनुसार दुकानगाळे सील करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या मालकीच्या दुकानाचे भाडेकरूंनी आपली थकबाकी तातडीने भरावी, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.