no images were found
अनाधिकृत बांधकाम कारवाईस उच्च न्यायालयाची स्थगिती नकार; महापालिकेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश
कोल्हापूर, : कोल्हापूर शहर हद्दीतील उचगाव महसुली क्षेत्रामधील गांधीनगर रोडलगतच्या मिळकतींमध्ये झालेल्या अनाधिकृत बांधकामांवर कोल्हापूर महानगरपालिकेकडून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू करण्यात आली असून संबंधित मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या कारवाईविरोधात काही मिळकतधारकांनी माननीय उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच, कोल्हापूर येथे याचिका दाखल करून कारवाईस स्थगिती देण्याची तसेच कारवाई रद्द करण्याची मागणी केली होती. सदर याचिकांवर आज सुनावणी पार पडली. यावेळी माननीय उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच, कोल्हापूर यांनी संबंधित कारवाईस कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश कोल्हापूर महानगरपालिकेस दिले. संबंधित याचिकांची पुढील सुनावणी 9 जून रोजी निश्चित करण्यात आली आहे.या प्रकरणात कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ शैलेश नायडू तसेच पॅनल विधिज्ञ अभिजीत आडगुळे यांनी प्रभावी बाजू मांडली.