no images were found
चलवादी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत देदिप्यमान यश
पुणे इंटरनॅशनल स्कूलसह विश्वभारती विद्यालयाचा निकाल उत्कृष्ट:मयूर गव्हाणे, आरोही धेंडे विद्यालयात प्रथम
पुणे:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, विद्यानगर येथील चलवादी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. संस्थेच्या पुणे इंटरनॅशनल स्कूल आणि विश्वभारती माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा निकाल यंदाही उल्लेखनीय लागला आहे. विद्यालयाचा विद्यार्थी मयूर गव्हाणे याने ९४% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. जानवी नवगिरे हिने ९१% गुणांसह द्वितीय, तर अरुण प्रजापती याने ८०.२०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. संस्थेच्या विश्वभारती माध्यमिक विद्यालयात आरोही धेंडे ७७% गुण मिळवून शाळेत प्रथम आली. बबलू राठोड ७६% गुणांसह द्वितीय, तर मल्लिका चलवादी ७५% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
स्पर्धेच्या युगात जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील मुलांमध्ये असलेल्या प्रचंड गुणवत्तेला योग्य दिशा देण्याचे काम आमच्या शिक्षकांनी केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो,अशी भावना चलवादी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केली. या यशाबद्दल संस्थेच्या उपाध्यक्षा ऍड.रेणुका चलवादी आणि सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिर्के यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यानगर परिसरात विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशात पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य स्मिता लोंढे, व्यवस्थापिका सायली शिंदे, उपप्राचार्य अश्विनी मोहिते तसेच विश्वभारतीचे मुख्याध्यापक विजय गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षिका ललिता धावणे, शिल्पा गायधने, तरन्नुम शेख, प्रमिला जाधव, रूपाली कचरे, संतोष जाधव आणि शिक्षक बाळासाहेब इमडे, किशोरी फुलसुंदर, नंदा सातपुते यांच्यासह सर्व कर्मचारी वृंदाने विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी वर्षभर कठोर परिश्रम घेतले.