no images were found
भविष्यातही माझी गरज,: सतेज पाटील
कोल्हापूर(प्रतिनिधी): ‘गोकुळ’च्या नवीन जनरेटरचे उद्घाटन झाले, नारळ सर्वांनी फोडला, पण जनरेटर सुरू करण्याचे बटन दाबण्याचा मान मात्र मलाच मिळाला. म्हणजे जनरेटर चालू करणारा मीच आहे, त्यामुळे पुढेही मी तुम्हाला लागणारच, असा मिश्किल चिमटा काॅंग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी काढला. तर महापालिकेच्या निवडणुकीत सतेज पाटील (बंटी) व आपल्यामध्ये संघर्ष झाला, आता त्यांनी संघर्ष न करता आमच्यासोबत यावे, अशी गुगली वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी टाकली.
‘गोकुळ’ दूध संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांची १२ वी पुण्यतिथी व २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केल्याबद्दल कलश पूजन समारंभ शुक्रवारी संघाच्या गोकुळ शिरगाव येथील दूध प्रकल्पावर झाला. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘राजकारणात आपल्या भूमिका वेगवेगळ्या असतील, पण ‘गोकुळ’मध्ये आम्ही सर्वजण एकत्र आहोत. ‘गोकुळ’ ही कोल्हापूरची ओळख असून, शेतकऱ्यांचे हित जपणे हेच आपले सामूहिक ध्येय आहे.’
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘गोकुळ’मध्ये आम्ही सर्वजण शेतकरी हितासाठी एकत्र आलो आहोत. शरीराने सगळे येथे उपस्थित असलो तरी मनाने सध्या सगळ्यांचे लक्ष महानगरपालिकेच्या निकालाकडे लागले आहे. तिथे आम्ही आणि बंटी पाटील यांनी संघर्ष केला आहे. आता बंटी पाटील यांनी संघर्ष न करता आमच्यासमवेत यावे.’ ‘ठीक आहे, पण पालकमंत्री प्रकाश आबिटकर व के. पी. पाटील यांचे काय ते सांगा’, अशी सतेज पाटील यांनी विचारणा केल्यानंतर व्यासपीठावर एकच हशा पिकला.
संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर हे नेहमी सांगायचे, शेतकरी हाच माझा पक्ष आहे. दुधामध्ये कुठलाही भेदभाव नसतो. सर्व दूध पांढरेच असते, त्यामुळे भविष्यात ‘गोकुळ’च्या दुधाचा रंगही पांढराच राहील. २५ लाख लिटरच्या कलश पूजनाचा कार्यक्रम आपणा सर्वांच्या हस्ते व्हावा आणि त्यावेळीही आम्ही उपस्थित असावे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.