no images were found
दियाच्या फटकळ आईच्या रूपात रितू वशिष्ठ
सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत अन्विता (सुंबुल तौकीर खान) आणि तिच्या भावंडांची गोष्ट आहे, जे सर्व मिळून आपले खडतर जीवन हिंमतीने, आशेने आणि चिवटपणे जगत आहेत. त्यांच्या वडिलांच्या सुहासच्या (वरुण बडोला) डोक्यावर कर्जांचे ओझे आहे आणि त्याने वारंवार घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे त्याच्या कुटुंबाची दुर्दशा झाली आहे. अशा परिस्थितीमुळे कुटुंबाचा भार अकाली अन्वितावर येऊन पडला आहे. प्रत्येक आव्हान पार करताना तिचा दृढनिश्चय आणि तिची लढण्याची जिद्द ही तिची ताकद बनते आणि त्याच्या बळावर ती आजवर आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यात यशस्वी झाली आहे. या कथानकात अलीकडेच जेष्ठ अभिनेत्री रितू वशिष्ठची एंट्री झाली आहे. ती फीबी फर्नांडिसची भूमिका करत आहे. फीबी ही अन्विताची खास मैत्रीण दिया (मनिका मेहरोत्रा) ची फटकळ आणि हेकेखोर स्वभावाची आई आहे. तिच्या आगमनामुळे या कथानकात एक गंमत आणि प्रत्यक्ष जगाचा दृष्टिकोन आला आहे, ज्यामुळे विविध पात्रांमधील नाती अधिक गतिशील आणि समृद्ध झाली आहेत.
फीबी ही सर्वसामान्य आईसारखी नसली, तरी तिचे आपल्या मुलीवरील प्रेम तसेच अढळ आहे. ती दियाचे हित आणि संरक्षण याची सतत काळजी घेत असते. आपल्या स्वभावाला धरून बऱ्याचदा फीबी ऐकते कमी आणि मनात येईल ती कृती करून मोकळी होते. त्यामुळे गंमती-जमती घडतात. फीबी एक जिद्दी स्त्री आहे आणि तिची काही ठाम मते आहेत. सुरुवातीला तिने दिया आणि पर्सी (मेहरझान माझदा) यांच्या नात्याचा उघडपणे विरोध केला, पण दियाचा आनंद जपण्याचा अन्विताने तिला दिलेला सल्ला तिने मानला होता. तिला जेव्हा कळेल की पर्सी आधीपासून विवाहित असून दियाशी विवाह करण्यासाठी तो घटस्फोट मिळवण्याच्या मागे लागला आहे, तेव्हा ती काय प्रतिक्रिया देते, हे बघणे रोचक असेल.
रितू वशिष्ठने फीबीच्या भूमिकेत एक आपलेपणा, चातुर्य आणि मोहकता आणली आहे. ती एक अशी आई आहे जी लुडबूड करते पण तिचा उद्देश चांगला असतो. तिच्या येण्यामुळे ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत विनोद, भावनिकता आणि एक नवी ऊर्जा आली आहे.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना रितू वशिष्ठ म्हणते, “फीबी एक कणखर, ठाम मताची आणि उत्साही स्त्री आहे. ती सर्वसामान्य मातेसारखी नाही. हीच गोष्ट मला फार आवडते. तिला जे वाटते, ते ती बोलते, आपल्या मतावर ठाम राहते पण या सगळ्याच्या मुळाशी आपल्या मुलीविषयीचे तिचे प्रेम आहे. या भूमिकेच्या बाबतीत मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे तिच्यातील गांभीर्य आणि विचित्रपणा यांचे संतुलन. फीबी आपल्या मुलीच्या सुरक्षेबाबत फारच दक्ष आहे, पण कधीकधी तिचा आडमुठेपणा आणि तिच्या लहरी स्वभावामुळे गंमतीशीर प्रसंग उद्भवतात. हलका-फुलका विनोद निर्माण होतो, जो लोकांना नक्की आवडेल असे मला वाटते.”