no images were found
‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामविस्तारासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन : योग्य तो प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे कुलगुरुंचे आश्वासन !
कोल्हापूर (प्रतिनिधी):- कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख असल्याने विद्यापीठाचे नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु राष्ट्र समन्वय समिती आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांना निवेदन देण्यात आले. ‘प्रक्रियेनुसार नामविस्ताराचा हा निर्णय शासनस्तरावर होतो. शासनस्तरावरून या संदर्भात जेव्हा आम्हाला विचारणा होईल, तेव्हा याविषयी आम्ही योग्य तो प्रस्ताव प्रस्ताव शासनाकडे पाठवू’, अशी ग्वाही कुलुगरु यांनी शिष्टमंडळास दिली.
या प्रसंगी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. महादेव यादव महाराज, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ , महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर सहजिल्हासंयोजक श्री. अभिजित पाटील, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. महेंद्र अहिरे उपस्थित होते.
प्रारंभी श्री. सुनील घनवट यांनी यांनी विद्यापीठाच्या नामविस्ताराविषयी कुलगुरूंना सविस्तर भूमिका सांगितली. महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या इतिहासातील महान योद्धा, आदर्श राज्यकर्ता आणि लोककल्याणकारी विचारांचे अध्वर्यू असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून, आमच्या अस्मितेचे व अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावाचा अपूर्ण उल्लेख करणे हा त्यांच्या महान कार्याचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अवमानच आहे. त्यामुळे हा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा झालाच पाहिजे, असे सांगितले. वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. महादेव यादव महाराज म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आपणा सर्वांसाठीच आदर्श आणि वंदनीय असून कुलगुरुंच्या कार्यकाळात हा नामविस्तार झाल्यास आनंदच वाटेल.’’