no images were found
रानी मुखर्जी म्हणाली, “मला फक्त माझा हीरो – शाहरुख खान याच्यासोबत रोमॅंटिक चित्रपट करायला आवडतात”
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल१३ या गायन रियालिटी शो मध्ये या आठवड्यात खुद्द रानी मुखर्जीच्या उपस्थितीत तिला समर्पित ‘ड्रीम फिनाले’ सादर होणार आहे. या कार्यक्रमात पहिल्यांदाच आलेली रानी स्पर्धेतील टॉप ७ स्पर्धकांच्या परफॉर्मन्सचा आस्वाद घेता घेता आपल्या ‘मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्व्हे’ या आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसेल. कोलकाताहून आलेली बिदीप्ता ‘कभी अलविदा ना कहना’ आणि ‘बंटी और बबली’ चित्रपटातील अनुक्रमे ‘तुम्ही देखो ना’ आणि ‘चुप चुप के’ ही गाणी सादर करून सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडेल.
बिदीप्ताच्या हृदयस्पर्शी परफॉर्मन्सचे कौतुक करताना रानी मुखर्जी म्हणाली, “मी अनेक वेगवेगळे चित्रपट केले आहेत, पण ‘रोमान्स’ हा माझा आवडता प्रकार आहे. मला माझ्या ज्या हीरोबरोबर रोमॅंटिक चित्रपट करायला आवडतात, तो म्हणजे एकमेवाद्वितीय शाहरुख खान! तू जे पहिलं गाणं म्हटलंस,‘तुम्ही देखो ना’ ते माझ्या कारकीर्दीतील माझं अत्यंत आवडतं गाणं आहे. आम्ही ‘कभी अलविदा ना कहना’चं शूटिंग न्यूयॉर्कमध्ये केलं होतं आणि मला आठवतंय की त्या सप्टेंबरच्या महिन्यात तिकडे प्रचंड थंडी होती. ‘तुम्ही देखो ना’ गाण्यात वेगवेगळ्या ऋतूंमधला रोमान्स दाखवला आहे. गाण्यातल्या एका भागात पाऊस दाखवायचा होता आणि त्यावेळी मला लाल रंगाची साडी परिधान करायची होती. तो भाग आम्ही जेव्हा चित्रित करायला गेलो, तेव्हा पाऊस पडणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही, कारण पाऊस गोठू लागला होता.”
‘चुप चुप के’ गाण्याबद्दल रानी म्हणाली, “बंटी और बबली एक मस्त सिनेमा होता आणि बिदीप्ता तू त्या चित्रपटातलाच एक पोशाख परिधान केला आहेस, जो तुला छान दिसत आहे. विशेषतः आपल्या मनगटावर तू जे रेशमी रबरबॅंड (स्क्रंची) बांधले आहेस, ते पाहून मला या चित्रपटाच्या शूटिंगचे दिवस आठवले. आम्ही जेव्हा हे गाणे लडाखमध्ये चित्रित केले, तेव्हा तिकडे प्रचंड थंडी होती. त्यावेळी गरमागरम मॅगी नूडल्स खायला खूप मजा यायची!”
त्या व्यतिरिक्त, रानी मुखर्जी बिदीप्ताला ‘कुछ कुछ होता है’ मधल्या टीनाचा अभिनय कसा करायचा हे देखील शिकवताना दिसेल!