no images were found
ठाण्यात आज मुख्यमंत्र्यांचा होणार सत्कार ; निवासस्थानापासून ते घाणेकर नाट्यगृहपर्यंत निघणार मिरवणूक
ठाणे : ठाणे जिल्ह्याला एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळाला असून यानिमित्ताने ठाण्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांतर्फे शिंदे यांचा आज, शनिवारी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमापूर्वी शिंदे यांच्या नितीन कंपनी येथील निवासस्थानापासून कार्यक्रमस्थळापर्यंत त्यांच्या मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात ठाण्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय, औद्योगिक आदी विविध क्षेत्रांतील दीडशेहून अधिक संस्थांच्या पुढाकाराने शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, त्र्यंबकेश्वरच्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश अण्णासाहेब मोरे आणि कोल्हापूरच्या कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळय़ास मंत्री उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण हेदेखील उपस्थित राहणार असून त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात येईल.