no images were found
रंकाळा तलाव परिसरात सुरक्षा व स्वच्छतेसाठी विशेष पथकाची नियुक्ती
कोल्हापूर, : ऐतिहासिक रंकाळा तलाव परिसरातील स्वच्छता, सुरक्षा, सार्वजनिक शिस्त आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोल्हापूर महानगरपालिकेने विशेष सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित केली आहे. आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार हे पथक स्थापन करण्यात आले आहे. यासाठी पथक प्रमुखासह दोन सुरक्षा सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली असून संपूर्ण रंकाळा तलाव परिसरात नियमित गस्त व देखरेख केली जाणार आहे.
सुरक्षा सहाय्यकांकडून नियुक्त क्षेत्रात नियमित पायी गस्त घालून तलावाचा काठ, सार्वजनिक परिसर, धोकादायक ठिकाणे, रेलिंग, फरशी, लाईट, बाक व कठडे यांची पाहणी केली जाणार आहे. आढळणाऱ्या त्रुटींची छायाचित्रांसह माहिती पथक प्रमुखांना देण्यात येणार आहे. तसेच नागरिक व पर्यटकांना सुरक्षिततेबाबत आवश्यक सूचना देण्याबरोबरच गर्दी नियंत्रण आणि वाहनांच्या सुनियोजित पार्किंगबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
रंकाळा तलाव परिसरातील कचरा, प्लास्टिक, थर्माकोल किंवा अस्वच्छता आढळल्यास संबंधित स्वच्छता पथकाला तात्काळ कळविण्यात येणार आहे. सार्वजनिक शौचालये, कचरापेट्या तसेच कचरा उचलण्याच्या व्यवस्थेवरही लक्ष ठेवले जाणार आहे.
अनधिकृत हातगाड्या, स्टॉल, विक्री केंद्रे व अतिक्रमण आढळल्यास संबंधित अतिक्रमण निर्मूलन पथकाशी समन्वय साधून कारवाई केली जाणार आहे. तलावात कचरा, सांडपाणी किंवा प्रदूषक पदार्थ टाकणे, कपडे अथवा जनावरे धुणे यास प्रतिबंध करण्यात येणार असून प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
विशेषतः सकाळ, दुपार व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत अतिरिक्त गस्त ठेवण्यात येणार आहे. संशयास्पद हालचाली, भांडण, गैरप्रकार किंवा आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास पोलीस, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन व वैद्यकीय यंत्रणेशी समन्वय साधला जाणार आहे. रंकाळा कारंजा परिसरातील गर्दीचे नियोजन आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठीही या पथकामार्फत विशेष लक्ष दिले जाणार आहे.