no images were found
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेची तिसरी फेरी सुरू; युवकांना इंटर्नशिपची सुवर्णसंधी
कोल्हापूर, : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, या योजनेअंतर्गत देशातील 18 ते 25 वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोणत्याही ठिकाणी नोकरी करत नसलेल्या युवकांसाठी ही योजना विशेषतः राबविण्यात येत आहे.
या योजनेद्वारे युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये 6 ते 9 महिन्यांच्या कालावधीची इंटर्नशिप दिली जाणार आहे. इंटर्नशिपदरम्यान प्रशिक्षणार्थींना दरमहा 9 हजार रुपये विद्यावेतनही मिळणार आहे. दहावी, बारावी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर पात्रता असलेल्या उमेदवारांनी इंटर्नशिपसाठी https://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी. इच्छुक उमेदवारांनी पोर्टलवर स्वतःचे प्रोफाईल तयार करून विविध क्षेत्रांतील उपलब्ध इंटर्नशिपसाठी अर्ज करावा.
जुबलीकंट फूड वर्क्स लिमिटेडमध्ये ऑपरेशन्स मॅनेजमेंटसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जून असून, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडसाठी 18 जून आणि हवेल्स इंडिया लिमिटेडसाठी 27 जून ही अंतिम तारीख आहे. याशिवाय इतर अनेक कंपन्यांमधील इंटर्नशिपसाठीही अर्ज करता येणार आहे.
उमेदवारांना अर्जाच्या अंतिम मुदतीपर्यंत जास्तीत जास्त तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करता येणार आहेत. या योजनेअंतर्गत भारत सरकारतर्फे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यांचे विमा संरक्षण दिले जाते. तसेच संबंधित कंपनीकडून अतिरिक्त अपघात विमा संरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.