no images were found
विभागीय कार्यालयांचे विकेंद्रीकरण; पुढील महिनाभरात सक्षम कामकाजाचे नियोजन करा
आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचे निर्देश; पारदर्शकता, उत्पन्नवाढ आणि शिस्तीवर भर
कोल्हापूर, : महापालिकेच्या कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता व गती आणण्यासाठी सर्व विभागीय कार्यालयांचे विकेंद्रीकरण करण्यात आले असून, प्रत्येक कार्यालयाला स्वतंत्र सहाय्यक आयुक्त नियुक्त करण्यात आले आहेत. पुढील एक महिन्यात चारही विभागीय कार्यालयांनी सक्षमपणे कामकाज सुरू करावे, अशा सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या.
महापालिकेत आज झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी सर्व विभागीय कार्यालयांमध्ये आवश्यक सुविधा, फर्निचर व अन्य साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मिळकत वसुली, कर नियोजन आणि उत्पन्नवाढीवर विशेष भर द्यावा. कार्यालयातील स्क्रॅप साहित्याची नोंद तयार करून ते एकत्रित जमा करावे व त्याचा एकत्रित लिलाव करावा, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या. प्रत्येक सोमवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेण्यात येणार असून, दोन विभागांतील प्रलंबित प्रश्न चर्चेद्वारे मार्गी लावण्यात येणार आहेत. वर्षानुवर्षे कामावर अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना अंतिम संधी देऊन एकत्रित सुनावणी घ्यावी. तरीही अनुपस्थित राहिल्यास त्यांच्या कायम निलंबनाची कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच ज्या कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकांना टायपिंग येत नाही, त्यांना प्रशिक्षणाची एक संधी देऊनही सुधारणा न झाल्यास पदावनती करण्याचा इशारा देण्यात आला. सध्याच्या तंत्रज्ञान युगात सर्व विभागांनी एआयचा वापर दैनंदिन कामकाजात करावा. एकाही कनिष्ठ अभियंत्याची बदली पूर्वपरवानगीशिवाय होऊ नये असेही त्यांनी स्पष्ट केले. निलंबित कर्मचाऱ्यांच्या चौकशी प्रकरणांचा निपटारा मुदतीत करण्यासाठी दर शनिवारी विशेष बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले. पावसाळा तोंडावर आल्याने शहरातील धोकादायक झाडे हटविणे, रस्त्यांवरील लोंबकळणाऱ्या फांद्या छाटणे यासाठी तातडीने मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच रंकाळा तलाव परिसरातील उद्यानाचे खराब झालेले प्रवेशद्वार त्वरित बदलण्याचे आदेश उद्यान विभागाला देण्यात आले. शहरात सुरू असलेल्या मोठ्या बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी संबंधित व्यावसायिकांनी डिजिटल बोर्डवर प्रकल्पाची माहिती प्रदर्शित करावी अशा सूचना उपशहर रचनाकारांना देण्यात आल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा. आयुक्त जयंत जावडेकर, उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ.विजय पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखा वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, नगरसचिव सुनील बिद्री, शहर अभिंतया रमेश मस्कर, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, सहा.विद्युत अभियंता नारायण पुजारी उपस्थित होते.