no images were found
शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माहितीसाठी संपर्क साधा – निळकंठ करे
कोल्हापूर : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत सन 2017 ते 2020 या तीन आर्थिक वर्षांमध्ये किमान दोन आर्थिक वर्षांत शेतकऱ्याने पीक कर्जाची उचल करुन विहित मुदतीत परतफेड केल्यास शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरतात. या योजनेनुसार जास्तीत जास्त अनुदानाची मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत आहे. कर्जाची रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास तेवढ्या रकमेच्या लाभासाठी संबधित शेतकरी पात्र आहेत. प्रोत्साहनपर योजनेबाबतची माहिती जाणून घ्यावयाची असणाऱ्या शेतकऱ्यांनी नजिकच्या महा-ई सेवा केंद्राशी अथवा संबंधित तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सहाय्यक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी केले आहे.
या योजनेसाठी दि. 29 जुलै 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये खालील अपात्रताचे निकष निश्चित केले आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी, राज्यातील आजी, माजी मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा, राज्यसभा सदस्य, विधानसभा, विधान परिषद सदस्य, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजार पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून), राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण, एस. टी. महामंडळ इ.) व अनुदानित संस्थांचे अधिकारी व कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजार पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून), शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती, मासिक निवृत्तीवेतन रुपये 25 हजार पेक्षा जास्त असणाऱ्या निवृत्ती वेतनधारक व्यक्ती (माजी सैनिक वगळून), कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघाचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजार पेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)
जिल्ह्यातील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर सानुग्रह अनुदान अतंर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील एकुण 3 लाख 944 कर्ज खात्याची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. अपलोड केलेल्या कर्ज खात्यापैकी 1 लाख 89 हजार 358 कर्जखातेदारांना पोर्टलवरुन विशिष्ट ओळख क्रमांक प्राप्त होऊन पात्र यादीत नाव आले आहे. प्राप्त 1 लाख 89 हजार 358 कर्ज खात्यापैकी एकुण 1 लाख 87 हजार 622 कर्ज खातेधारकांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. प्रमाणिकरण केलेल्या 1 लाख 87 हजार 622 कर्ज खातेधारकांपैकी 1 लाख 77 हजार 359 कर्ज खातेधारकांना 644.69 कोटी रुपये प्रोत्साहनपर सानुग्रह अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला आहे. आधार प्रमाणिकरण केलेल्या 1 लाख 87 हजार 622 पैकी उर्वरित 10 हजार 263 कर्ज खातेधारकांना आधार प्रमाणिकरण करुनही प्रोत्साहनपर सानुग्रह अनुदान मिळाले नाही.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या पोर्टलकडून एकूण 32 हजार 488 शेतक-यांची कारणासह अपात्र यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. प्राप्त यादीमधील अपात्रतेची प्रमुख कारणे खालील प्रमाणे आहेत.
शासकीय कर्मचारी (शालार्थ/सेवार्थ मधील) असल्याने अपात्र आहेत. आयकर भरणा करणारे कर्मचारी तसेच राखून ठेवलेली सभासद यादी क्रमांक 1 समाविष्ट शेतकरी 54 हजार 574 व यादी क्रमांक 2 समाविष्ट शेतकरी 54 हजार 573 असे एकूण 1 लाख 9 हजार 147 शेतक-यांची राखून ठेवलेली यादी कारणासह प्राप्त झाली आहे.
प्राप्त यादीमधील शेतकऱ्यांची नावे राखून ठेवल्याची प्रमुख कारणे खालील प्रमाणे – तीन आर्थिक वर्षात 1 हंगामाची उचल केल्याने, एकाच आर्थिक वर्षात 2 हंगामाची उचल केल्याने, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ मिळाल्याने व काही प्रमाणात लाभ वितरीत केला असल्याने या यादीतील नावे राखून ठेवण्यात आली आहे.
या कारणांमुळे शेतकऱ्यांची यादी राखून ठेवली आहे. अपात्र ठरलेल्या, राखून ठेलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी नजिकच्या महा-ई सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे. अथवा संबधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयामध्येही ही यादी उपलब्ध असल्याची माहिती श्री. करे यांनी दिली आहे.