no images were found
वाधवान बंधूंची ७० कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त
मुंबई: डीएचएफएल घोटाळाप्रकरणी कपिल आणि धीरज वाधवान या दोघांची ७० कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी रात्री उशिरा जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेत वांद्रे येथील दोन फ्लॅट्स, महागडी पेंटिंग्ज आणि शिल्प यांचा समावेश आहे. तसेच पाच कोटी रुपयांची आलिशान घड्याळे, दहा कोटी ७१ लाख रुपयांचे दागिने यांचाही समावेश आहे.
एका हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या ९ कोटी रुपये मूल्याच्या २० टक्के गुंतवणुकीचाही जप्त केलेल्या मालमत्तेत समावेश आहे. गेल्या मार्चमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने तपास केला होता. त्यावेळीही त्यांची कोट्यवधींची मालमत्ता ईडीने जप्त केली होती.
युनियन बँकप्रणीत १७ बँकांकडून घेतलेल्या हजारो कोटी रुपयांच्या कर्जाचा तपास ईडी करत आहे. घोटाळ्याची ही रक्कम ४२ हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे समजते. यापैकी ३४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा वाधवान बंधूंनी केल्याचे समजते.
दरम्यान वाधवान बंधू सध्या कोठडीत आहेत. मात्र वैद्यकीय सुविधेच्या नावाखाली के. ई. एम आणि जे. जे. रुग्णालयाच्या आवारात त्यांचे खासगी व्यक्तींसोबत भेटीगाठीचे प्रकरण उघड झाले होते. त्यानंतर नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी सात पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली होती.