no images were found
नीलेश राणे भाजपच्या सेवेत पुन्हा रुजू
मुंबई: नीलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून कायमची निवृत्ती घेतल्याची घोषणा केली होती. त्यांनी सोशल मीडियावरुन ही घोषणा करताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
नीलेश राणे यांच्या या घोषणेनंतर भाजपच्या गोटात वेगवान हालचाली होऊन २४ तासांत नीलेश राणे यांची मनधरणी करण्यात पक्षाने यश मिळवले आहे. त्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण बुधवारी सकाळीच राणे कुटुंबीयांच्या जुहू येथील अधीश बंगल्यावर पोहोचले होते. याठिकाणी नीलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली. त्यानंतर रवींद्र चव्हाण हे नीलेश यांना घेऊन थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले. याठिकाणी बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर नीलेश राणे यांनी आपला राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेत भाजपच्या सेवेत पुन्हा रुजू होण्याची तयारी दर्शविली.
फडणवीस यांच्या बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर रवींद्र चव्हाण आणि नीलेश राणे एकत्रच प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. तेव्हा रवींद्र चव्हाण यांनी नीलेश राणे यांच्या नाराजीचे कारण स्पष्ट करत पुन्हा असला प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही सर्वांसमक्ष नीलेश राणे यांना दिली. तर नीलेश राणे यांनी एकही शब्द न बोलता शांत राहणेच पसंत केले.